वाघोलीतील दोघे दोन वर्षांसाठी तडीपार
लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून कारवाई

वाघोली : लोणीकंद पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील इशाप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २२ रा. रामचंद्र कॉलेज जवळ) व अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (२३ रा. गाडे वस्ती) यांना परिमंडळ-४ चे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली, बकोरी फाटा, लोणीकंद तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांमुळे लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम निर्माण होऊ नये तसेच कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने लोणीकंद पोलिस स्टेशनच्या पथकाने विशाल पंदी व मुन्ना पटेल या दोघांवर दाखल गुन्ह्याचा अभिलेख तपासून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचेकडे पाठवला होता. त्यानुसार उपायुक्त बोराटे यांनी सदर प्रस्ताव मंजुर करून पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे.