वाघोलीतील सुपुत्र लेफ्टनंट कर्नल सदानंद चौहान यांच्या निर्मितीची पंतप्रधानांसह लष्करप्रमुखांनी घेतली दखल
चौहान यांनी केली ड्रोनविरोधी व्यवस्थानिर्मिती; सीमावर्ती भागातील लवकरच होणार तैनात
वाघोली : प्रतिनिधी
भारताच्या पाकिस्तान, चीन आदी सीमारेषांवर मागील काही काळापासून ड्रोनचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे संबंधित ड्रोनचा यशस्वी सामना करण्यासाठी वाघोली येथील साई संस्कृती सोसायटीत रहिवासी असलेल्या भारतीय लष्करातील अधिकारी सदानंद चौहान यांनी ड्रोनविरोधी अत्याधुनिक व्यवस्थानिर्मिती केली आहे. एअरो इंडियामध्ये सदानंद चौहान यांच्या या कामाची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी घेतली. लवकरच सदर प्रणाली तैनात करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील.
पाकिस्तान लगतच्या पंजाब, जम्मू व काश्मीर राज्यातील सीमावर्ती भागात सैन्याच्या हालचाली, ठिकाणे, कॅम्प याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी शत्रूकडून ड्रोनचा वापर होतो. अशा वेळी भारतीय लष्करी जवान, बीएसएफ जवान यांना भौगोलिक विस्तार अधिक असल्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवणे शक्य नाही. त्याचा गैरफायदा घेत शत्रू राष्ट्र ड्रोनच्या साहाय्याने सीमावर्ती भागातील व्हिडिओ, फोटो घेऊन त्याचा वापर युद्धाच्या रणनीतीसाठी करतो. यावर उपाय म्हणून लेफ्टनंट कर्नल सदानंद चौहान यांनी प्रयत्न केले. ‘फील्ड डिप्लोएबल सॅटेलाइट नेव्हिगेशन स्नुपिंग सिस्टिम’ (एफ-एसएनएस) असे या प्रणालीचे नाव असून जॅमरसारखे काम ते करते. लवकरच त्याचे नवीन नामकरण होईल. महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकॉममध्ये एमटेक प्रकल्पदरम्यान त्यांनी दीड वर्षाच्या प्रयत्नाने अँटी ड्रोन प्रणाली विकसित केली. त्याची प्रत्यक्षात दक्षिण सीमारेषेवर चाचणी झाली. दिल्लीमध्ये इंडियन आर्मी आयडिया अँड इनोव्हेशन स्पर्धेत या प्रणालीस नावाजले गेले आहे. आर्मी डिझाइन ब्युरोद्वारे या प्रणालीची अंमलबजावणी ३ महिन्यांत केली जावू शकते.