बनावट कागदपत्राद्वारे दस्त नोंदणी : धक्कादायक प्रकार उघडकीस
सह दुय्यम निबंधक हवेली-१३ कार्यालयातील प्रकार; अॅॅड. शरद बांदल यांची निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
पुणे : हवेलीतील सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली तेरा मध्ये पक्षकार व सहाय्यक निबंधक यांनी संगनमताने रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी करून शासनाची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्या हवेली तेरा सह दुय्यम निबंधक कार्यालयात चाललेल्या सावळ्यागोंधळाच्या कामकाजाची सखोल चौकशी होऊन संबधित सह. दुय्यम निबंधकाचे निलंबन करावे अशी मागणी अॅॅड. शरद बांदल यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांचेकडे केली आहे. संबधित सह. दुय्यम निबंधकावर पंधरा दिवसांमध्ये कारवाई करावी अन्यथा महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा बांदल यांनी दिला आहे.
सह दुय्यम निबंधक हवेली कार्यालय-१३ मध्ये सह. दुय्यम निबंधक राजेंद्र मेहन यांनी पक्षकाराच्या संगनमताने आर्थिक लाभासाठी रेरा कायद्याचे उल्लंघन करून बनावट कागदपत्राद्वारे बेकायदेशीरपणे दस्त नोंदविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अॅॅड. शरद बांदल यांनी सह निबंधक कार्यालय हवेली-१३ मध्ये चाललेल्या सावळ्यागोंधळाची सखोल चौकशी करून संबधित सह दुय्यम निबंधक यांचेवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी बेकायेदेशीर नोंदविण्यात आलेल्या सूची दोन व दस्तांच्या प्रती महानिरीक्षक यांचेकडे निवेदनासह अॅॅड. बांदल यांनी सादर केल्या आहेत. पंधरा दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अॅॅड. बांदल यांनी दिला आहे. सह. निबंधक राजेंद्र मेहन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.