वाघोली महापालिका संपर्क कार्यालयात एकच अधिकारी हजर; दहा पेक्षा अधिक गैरहजर

सुनील जाधवराव व अनिल सातव पाटील करणार गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

वाघोली  :  वाघोली गावाचा पुणे महापालिकेत समावेश होऊन चार महिने उलटले. परंतु अद्यापही पुणे महानगरपालिका वाघोली संपर्क कार्यालयामध्ये एक अधिकारी वगळता अन्य विभागाचे दहा पेक्षा अधिक अधिकारी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा मोठा सामना करावा लागत आहे. गैरहजर राहणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी महापौर व आयुक्तांकडे करणार असल्याची माहिती समाजिक कार्यकर्ते सुनील (चाचा) जाधवराव व भाजपा युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील यांनी दिली.

पुणे महापालिकेत वाघोली गावाचा समावेश होऊन चार महिने झाले. परंतु पाणी, ड्रेनेज, बांधकाम, पथ, दिवाबत्ती, आरोग्य, जन्म मृत्यु, विवाह दाखला, माहीती आदि विभागांचे अधिकारी अद्यापही वाघोली कार्यालयात उपस्थित नाहीत. पायाभूत सुविधांसाठी ग्रामपंचायती मार्फत पुर्ण करण्यात आलेल्या विविध विकास कामांसाठी किरकोळ (मेंटेनन्स) खर्चाची देखील कोणतीच तरतुद अदयापपर्यंत महापालिकेकडून करण्यात आलेली नाही.

पुणे महापालिकेमध्ये सामाविष्ट करण्यात आलेले वाघोली गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठे असून गावाची लोकसंख्या अंदाजे दोन लाखांच्या पुढे आहे. पावसाळ्यात फुलमळा रोड, दरेकर वस्ती, नगर रोड इ. ठिकाणी रस्त्यावर पावसाचा साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या साचणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुद्धा केले. त्याचबरोबर कमलबाग व काळूबाई नगर येथे अर्धवट गटार लाईनमुळे व केसनंद रोडवरील चिंतामणी चौक काळे ओढा येथे गटार लाईन फुटल्याने येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असून येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पथदिवे मेंटेनन्स अभावी बंद आहेत. काही कचरा गाड्या नादुरुस्त असून खर्चा अभावी बंद आहेत.

वाघोली ग्रामपंचायतीने सातत्याने पाठपुरावा करून वाघोली गावासाठी वढू बुद्रुक बंधाऱ्यातून वाढीव पाणीपुरवठा योजनेकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून २२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामध्ये वढु-वाघोली व वडजाई-वाघोली नवीन पाणीपुवठा योजनेचा समावेश आहे. वाघोली ग्रामपंचायतकडून या दोन पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु गावाचा समावेश झाल्यानंतर महापालिकेकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने व पाठपुरावा नसल्याकारणाने पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. त्याचबरोबर कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यलयाकडे कचरा प्रकल्प उभारणीसाठी काही सरकारी जागांची मागणी केली होती. परंतु अद्यापही प्रकल्पासाठी निधीची कोणतीही तरतुद केली नसल्याने तोही प्रश्न रखडला आहे.

ट्राफिक समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत व एलजी कंपनीकडून काही वर्षांपुर्वी वाघेश्वर चौक आव्हाळवाडी फाटा व केसनंद फाटा या तीन ठिकाणी ट्राफिक सिग्नल बसविण्यात आले होते. सद्यस्थितीत मेंटेनन्स अभावी ते देखील बंद असल्याने ट्राफिक कोंडीची समस्या मोठयाप्रमाणावर भेडसावत आहे.

वाघोली गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर कर आकारणी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तत्परता दाखवून प्रामाणिकपणे कर वसूल केली जात आहे. संबधित कर आकारणी विभागाने वाघोलीमधून ३ कोटींपेक्षा जास्त कर तीन महिन्यात गोळा करण्याचा उच्चांक गाठला तसा वाघोलीतील समस्या व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्परता दाखविणे गरजेचे आहे. कर वसुलीसाठी संबधित विभागाकडून तत्परता दाखविण्यात येते मग विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत एवढी उदासीनता का दाखवण्यात येते असा प्रश्न सुनील जाधवराव व अनिल सातव पाटील यांनी उपस्थित केला आहे.

वाघोली गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतने २१ प्रस्तावित अपुर्ण कामे पूर्ण करण्याबाबतची यादी महापालिकेला दिली होती. यामध्ये बहुतांश ड्रेनेजची कामे असून इतर अपूर्ण कामाचा सुद्धा समावेश यामध्ये आहे. अपूर्ण असलेल्या कामांसाठी महापालिकेने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुनील (चाचा) जाधवराव व अनिल सातव पाटील यांनी केली आहे.

 

संबधीत अधिकारी उपस्थित राहण्यासाठी स्थानिक आमदार यांनी आयुक्तांकडे पत्र देखील दिले होते तरी देखील अधिकारी गैरहजर राहतात. महापालिकेने मागील तीन महिन्यात ३ कोटी पेक्षा जास्त कर गोळा केला आहे. कर गोळा करण्यासाठी जशी तत्परता दाखवली जाते तशीच तत्परता समस्या सोडवण्यासाठी व विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी दाखवावी अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

– सुनील (चाचा) जाधवराव (सामाजिक कार्यकर्ते, वाघोली)

 

गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई महापौर व आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. वाघोली ग्रामपंचायतने मागील अडीच वर्षात पुर्ण केलेल्या विविध २५० कोटी रुपयांचा विकास कामांचा व त्याअगोदर असणाऱ्या सर्व ग्रामपंचायत कमिटींकडून करण्यात आलेल्या कामांच्या मेंटेनन्सची तरतुद तरी महानगरपालिकेने तात्काळ करून करून द्यावी व ग्रामपंचायतने दिलेल्या नवीन प्रस्तावित विविध कामांचा विकास निधी उपलब्ध करून द्यावा. कामे पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवणार आहे.

– अनिल सातव पाटील (हवेली तालुकाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा)

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button