पुणे मनपा आयुक्तांनी जाणून घेतल्या वडगावशेरी येथील नागरिकांच्या समस्या
कर घेता मग समस्या सोडवा नागरिकांमधून ऐकायला मिळाला एकच सुर
वडगावशेरी : रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी, भटके कुत्री, पूर ठिकाणे, आरोग्य, अतिक्रमण अशा विविध समस्या कायम आहेत. कर घेता मग प्राधान्याने समस्या का सोडवल्या जात नाहीत अशी वेगवेगळी प्रश्न महापालिका आयुक्तांना वडगावशेरी मध्ये ऐकायला मिळाली. समस्या अधिक असल्याने आयुक्तासमोर नागरिकांनी गोंधळ केला. आयुक्त गाडीत बसेपर्यंत त्यांच्या समोर समस्या मांडत होते. वडगावशेरी मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरीक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, आमदार सुनील टिंगरे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यासह सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
वडगावशेरीतील गार्डनिया सोसायटीचे चेअरमन शरद अडसूळ म्हणाले, मागील दहा वर्षांपासून आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी येते. यामुळे चारचाकी, दुचाकी गाड्या मध्ये पाणी जाऊन खराब होते. महापालिका तसेच शासनाच्या वतीने काहीही उपाय योजना करत नाही. आम्हाला नरक यातना मधुन सुटका करा अशी मागणी त्यांनी आयुक्तासमोर केली.
आयुक्त म्हणाले, लोहगावचा विकास आराखडा (डीपी) पालिकेने तयार केला होता. पण त्याची मुदत कालबाह झाली. त्यामुळे राज्य सरकारने अधिसूचना काढून लोहगावचा विकास आराखडा तयार करण्याचे काम नगररचना संचालनालयाला दिले आहे. नगररचना विभागाकडून येत्या वर्षभरात लोहगावचा विकास आराखडा तयार होईल. परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आणि रस्त्यावरील व्यावसायिक अतिक्रमणांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचेही आयुक्तांनी सांगितले.अनधिकृत बांधकामाविरोधात कडक कारवाईची भूमिक घेतली. ‘वडगावशेरी मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यावरील व्यावसायिक अतिक्रमणे वाढली आहेत. बांधकाम आणि अतिक्रमण विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याचा आदेश दिले.
नगर रस्त्यावरील निम्म्याहून अधिक ‘बीआरटी’चा मार्ग काढण्यात आला आहे. उर्वरित मार्ग काढण्यासाठी आमदार सुनील टिंगरे आणि काही पक्ष व संस्था मागणी करीत आहेत. यावर बोलताना आयुक्त म्हणाले, केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली शहरात बीआरटी मार्ग तयार करण्यात आला आहे. कोणत्याही ठोस शास्त्रीय कारणांचा आधार नसताना ‘बीआरटी’ मार्ग काढण्याचा निर्णय घेता येणार नाही. ‘बीआरटी’ मार्गात किती प्राणांतिक अपघात झाले, वाहतूक कोंडीची कारणे यावर पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य निर्णय घेऊ असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
वडगाव शेरी परिसरात पावसाळयात पाणी शिरणाऱ्या सोसायट्यांची आयुक्तींनी पाहणी करून माहिती घेतली. पावसाळ्यात पाणी का साचते, यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी बिल्डरांकडून नाले आणि ड्रेनेज वाहिन्यांवर अतिक्रमणे केल्याने पाणी शिरण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे अशा ठिकाणची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले. अनेक ठिकाणी रस्त्यावर, चौकात राजकीय नेत्यांनी उभारलेले बेकायदा फ्लेक्स आणि बॅनर दिसून आले. आयुक्तांनी यावर संबंधित विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बेकायदा फ्लेक्स किंवा बॅनर लावू नयेत असे आवाहनही आयुक्तांनी केले.