दर्शनासाठी आलेल्या भाविकाला हृदयविकाराचा झटका
पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले जेष्ठ नागरिकाचे प्राण; कुटुंबांनी मानले पोलिसांचे मनापासून आभार

पुणे : निमगाव (ता. खेड) येथे कुटुंबासह खंडोबाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या जेष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्याने जमिनीवर कोसळले. यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह त्यांचे कुटुंब व गाभाऱ्यातील पुजारी यांची धावपळ सुरु झाली. याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन दहा ते पंधरा मिनिट छातीवर पंपिंग करून विनाविलंब जवळच्या रुग्णालयात दाखल दाखल करून त्यांचे प्राण वाचवले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जेष्ठ नागरिकाला जीवदान मिळाल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
आळेफाटा (ता. जुन्नर) येथील प्राचार्य केशव नामदेव बोरकर (वय 53), मुलगी तन्वी बोरकर, मुलगा उपेंद्र बोरकर हे खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दर्शनसाठी रांगेत उभे होते. दरम्यान केशव बोरकर यांना अचानक चक्कर आली आणि ते गाभाऱ्यातील हर्षवर कोसळले तोंडातून फेस येऊन बेशुद्ध पडले. या घटनेमुळे भाविकांची पळापळ झाली. गाभाऱ्यातील पुजारी भाविक व बोरकर यांचा मुलगा, मुलगी घाबरून गेले. याठिकाणी कर्तव्यावर असलेले खेड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार मोहन अवघडे व पोलीस हवालदार सचिन गिलबिले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गाभाऱ्यातील भाविकांची गर्दी हटवली. बेशुद्धावस्थेत असलेल्या बोरकर यांच्या छातीवर दहा ते पंधरा मिनिटे पंपिंग करून विनाविलंब खाजगी वाहनाने राजगुरुनगर येथे जीवन रक्षक हॉस्पिटलला पुढील उपचारासाठी दाखल केले. बोरकर यांची प्रकृती सध्या स्थिर असून पोलीस हवालदार मोहन अवघडे व पोलीस हवालदार सचिन गिलबिले यांनी तात्काळ मदत करून जीवदान दिल्याबद्दल प्राचार्य किशोर बोरकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.