जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट
सुरळीत सुरु असलेल्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले समाधान व्यक्त; आरोग्य यंत्रणेचे केले कौतुक

- वाघोली प्राथमिक केंद्रात सुरु असलेल्या सलग ७५ तास लसीकरण मोहिमेत बुधवारी (दि. १३ ऑक्टोबर) रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत २२५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवार (दि. १४ ऑक्टोबर) दुपारी १२ पर्यंत लसीकरण सुरु राहणार असून नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु असलेल्या ७५ तास कोविड प्रतिबंधक लसीकरणास पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अचानक रात्री साडे अकराच्या सुमारास भेट दिली. दरम्यान लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. सुरळीतपणे सुरु असलेल्या लसीकरणाबाबत समाधान व्यक्त करून अहोरात्र प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
स्वातंत्र्याचे ७५ वर्ष लक्षात घेता राज्य शासनाकडून मिशन कवचकुंड मोहिमेंतर्गत दोन्ही महापालिका व ग्रामीण भागात ७५ तास कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरु असलेल्या लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. दिवसा कामामुळे येवू शकत नाहीत अशा कामगारांना रात्रीच्या लसीकरणामुळे लस घेणे शक्य होणार आहे. प्राथमिक केंद्रातील योग्य नियोजनामुळे पहिल्याच दिवशी जवळपास ६५० नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. पुणे जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पहिल्याच दिवशी सोमवारी (११ ऑक्टोबर) रोजी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु असलेल्या लसीकरणास अचानक भेट देवून पाहणी केली. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी लसीकरणास आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. रात्रीच्यावेळी सुद्धा लसीकरण सुरळीत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त करून आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.

पुणे जिल्ह्याने लसीकरणामध्ये आघाडी घेतली असून राज्य लोकसंख्येच्या प्रमाणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य शासनाच्या मिशन कवचकुंडल नुसार १० लाख लसीकरण करण्याचे करण्याच मानस आहे. काही गावे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी भर देणार आहोत.
– डॉ. राजेश देशमुख (जिल्हाधिकारी, पुणे)
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, वैद्यकीय अधिकारी नागसेन लोखंडे, वैद्यकीय अधिकारी राजेश्री सूर्यवंशी, ‘वाघोली बुलेटीन’चे संपादक अॅॅड. शरद बांदल, आरोग्य सहाय्यिका सुप्रिया पुरोहित, रामनाथ खेडकर, सचिन राखुंडे, आरोग्य सेवक रामकिसन घ्यार, सुनील पडवळ, रंगनाथ वऱ्हाडे, पुष्पा कलकोटे मनीषा दुचे, आदित्य देवरे, दिनेश थोरात, गणेश भीवरे, ओमकार दिघे, महेश सोनटक्के उपस्थित होते.