कृउबा समिती दौंडचे माजी सभापती मारुतराव मगर यांची रयत शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडचे माजी सभापती मारुतराव (बापू) रावसाहेब मगर यांची रयत शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नुकतेच अष्टापूर फाटा (ता. हवेली) येथे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अॅॅड. रवी प्रकाश देशमुख यांनी निवडीचे पत्र दिले.
कमी कालावधीत रयत शेतकरी संघटना मोठी झाली आहे. महाराष्ट्रामध्ये संघटना बळकट करणार असून संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह सामन्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे याप्रसंगी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष मगर यांनी सांगितले.
दरम्यान संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अॅॅड. रवी प्रकाश देशमुख यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना संपर्क करून यशवंत सहकारी साखर कारखान्याबाबत माहिती घेतली असता यशवंत संबधी आवश्यक असणारी माहिती देण्यात येईल असे आश्वासन आयुक्त यांनी दिले. यशवंत कारखाना सुरु करण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे अॅॅड. देशमुख यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रामदास कोतवाल, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत चौधरी, हवेली तालुका उपाध्यक्ष सुभाष टिखोळे, हवेली तालुका संपर्कप्रमुख विशाल पवार, अजित विविध कार्य सोसायटीचे चेअरमन शिवाजी कोतवाल, पोलीस पाटील कैलास कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते गणेश साठे, सचिन गवारे आदि संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.