गटाराच्या दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत उपाययोजना करा
काळूबाई नगरच्या संतप्त महिलांची मागणी

वाघोली : वाघोली येथील काळूबाई नगर मधील अंतर्गत रस्त्यांवर मागील दीड महिन्यांपासून ड्रेनेज अभावी गटाराचे पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी व नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर तीव्र भावना व्यक्त केल्या. याप्रकरणी गंभीर दखल घेऊन वेळीच उपाययोजना न केल्यास त्याच पाण्याने संबंधित मनपाच्या अधिकाऱ्यांना अभिषेक घालण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
वाघोली (ता. हवेली) येथील काळूबाई नगर मधील अंतर्गत रस्त्यांवर मागील दीड महिन्यांपासून गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत काळूबाई नगर येथील रहिवाशांनी वाघोली सहाय्यक उपायुक्त कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अधिकारी उपस्थित नसल्यामुळे हा गंभीर प्रश्न प्रलंबितच राहिला. त्यामुळे रविवार (दि. २९ ऑगष्ट) रोजी काळूबाई नगर येथील महिला रहिवाशांनी मनसेकडे दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्यासह अन्य समस्या मांडल्या. त्यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून उपाययोजना कराव्या अशी मागणी केली. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता उद्या येऊन पाहणी करून प्रश्न सोडवू असे सांगितले.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या चार दिवसांमध्ये प्रश्न सोडविण्यात आला नाही तर संबंधित मनपा अधिकाऱ्यांना त्याच पाण्याने अभिषेक घालण्यात येईल.
– गणेश म्हस्के (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधी विभाग, मनसे)