Video: गाड्या फोडणाऱ्या भाईची येरवडा पोलीसांनी काढली धिंड
१२ रिक्षा व २ मोटरसायकलची केली होती तोडफोड

येरवडा : येरवडा येथील लक्ष्मीनगर पोलीस चौकी शेजारील १२ रिक्षा व २ मोटरसायकलची तोडफोड करणार्या गुन्हेगाराला पकडून येरवडा पोलिसांनी जेथे तोडफोड केली त्या परिसरात धिंड काढली. तोडफोडीची ही घटना ६ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजता घडली होती.
सयाजी संभाजी डोलारे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे तोडफोड करणाऱ्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा परिसरात पार्क केलेल्या रिक्षा व दुचाकी पार्क केल्या होत्या. रात्री दोन वाजेच्या सुमारास परिसरात मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत शिवीगाळ करुन दहशत माजवत धारदार हत्याराने परिसरातील १२ रिक्षांच्या काचा फोडल्या. तसेच दोन दुचाकीवर वार करुन नुकसान केले. एका जेसीबीची काच देखील फोडली. फिर्यादी अबूबकर रजाक पिरजाते यांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर वार करुन जखमी केले होते. त्यानंतर डोलारे हा फरार झाला होता. अबूबकर रजाक पिरजाते (वय ३१ रा. लक्ष्मी नगर पोलीस चौकी शेजारी, येरवडा) यांच्या फिर्यादीवरून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
येरवडा पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली. त्यानंतर रात्री लक्ष्मीनगर परिसरात त्यांची धिंड काढली. जेथे जेथे गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजविली होती. त्या परिसरात हातात दोरखंड बांधून त्याला फिरविण्यात आले.