वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाची कारवाई

वाघोली : पुणे जिल्ह्यातून दीड वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकास वाघोली जवळील डोमखेल वस्ती येथून गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्यामकांत विष्णू सातव (वय ४०. रा. डोमखेल वस्ती, आव्हाळवाडी) असे पोलिसांनी जेरबंद केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारा मार्फत रेकॉर्ड वरील तडीपार हा वाघोली जवळील डोमखेल वस्ती येथे त्याचे राहते घरी आला असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने सदर ठिकाणाहून त्यास ताब्यात घेतले आहे. आरोपीला ऑगस्ट २०२४ पासून तडीपार करण्यात आले होते. हद्दीत मिळून आल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी वाघोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
सदरची कामगीरी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा, युनिट-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.