स्वच्छता कामगारांच्या संख्येत अनियमितता
दोनवेळा स्वच्छतागृह स्वच्छ केल्याचे दाखवून लाटली बिले; ‘कचऱ्यातून सोने’ मिळवण्याचा येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

येरवडा : येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागा अंतर्गत चालणाऱ्या आरोग्य कोटी मधून कामगारांच्या संख्येत अनियमितता आढळून येते. तसेच सीटीपीटी अंतर्गत दोनवेळा स्वच्छता गृह स्वच्छ केली जात नाहीत. बिल मात्र दोनवेळा स्वच्छता केले असल्याचे दाखवून काढले जात आहे. विशेष म्हणजे याच्यावर आरोग्य निरीक्षकांच्या सह्या असतात. असे असताना याची जबाबदारी घेण्यास वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तयार नाहीत, मग नेमकी जबाबदारी कोणी घ्यायची असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालया मधून आरोग्य विभागा मार्फत परिसरात स्वच्छतेचे कामकाज चालते. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांच्या अंतर्गत प्रत्येक भागात स्वच्छतेचे काम सुरू असते. मात्र स्वच्छता करण्याऐवजी कचऱ्यातून सोन’ कसे मिळेल हे आरोग्य निरिक्षक पाहत असतात. हॉटेल व्यावसायिक, सोसायट्या, कचरा गाड्या, ठेकेदार यांच्याकडून मुकादमास हाताशी धरून आरोग्य निरीक्षक मलिदा गोळा करतात. कर्मचारी हजर नसताना हजेरी लावणे, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या ऐवजी दुसरा कर्मचारी अॅड्जेस्ट करणे याद्वारे ‘वाई’ म्हणून दरमहा पैसै घेत असतात. राडारोडा न उचलता बिले काढण्यासाठी ठेकेदाराना मदत करत असतात. कचरा गाडीचे वजन कमी असताना वजन वाढवून ठेकेदारांना मदत करतात. एवढे कमी म्हणून की काय, ठेकेदाराशी हात मिळवणी करून अस्तित्वात कमी कामगार पण कागदावर मात्र ज्यादा कामगार दाखवून पगार काढले जात असल्याचा प्रकार येरवडा, धानोरी, कळस मधील आरोग्य कोटींवर सुरू आहे.
सीटीपीटीद्वारे दोन वेळा स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे आवश्यक असताना एकदाही स्वच्छता केली जात नाही. स्वच्छता केलेले फोटो मात्र वेगवेगळे दाखवले जातात. प्रत्यक्षात सर्वच स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत. बिले मात्र दरमहा काढण्यात येत आहेत. याला जबाबदार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आहेत. वेगवेगळ्या मार्गांनी गैरप्रकार सुरूच आहेत. ‘हनुमंता’ सारखी उडी मारून आलेले आरोग्य निरीक्षक प्रभारी वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना ‘मस’णात बसवण्याची शक्यता आहे. अभियंता असणाऱ्या मॅडम सुद्धा खोट्या हजेरीवर डोळे झाकून सह्या करत असल्याची चर्चा आहे. प्रभारी झालेल्याच्या घनकचरा विभागात वेगवेगळ्या तक्रारी रोज दाखल होत आहेत. त्यामुळे नव्याने दाखल झालेल्या सहाय्यक महापालिका आयुक्त मॅडमनी तरी याप्रकरणी लक्ष घालून या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मोहल्ला कमिटी सदस्यांनी केली आहे.
आमदारांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
वडगावशेरीचे आमदारांनी नुकतीच भल्या पहाटे बैठक घेतली होती. बैठकीत आरोग्य विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. यावर रोज एका अधिकाऱ्यानी आरोग्य कोटीवर जाऊन प्रत्यक्षात किती कामगार हजर आहेत. त्यांचे फोटो पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. हजेरी बुक देखील तपासण्यास सांगीतले होते. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. उपायुक्तांनी खडे बोल आरोग्य निरीक्षक, मुकदमा यांना सुनावले होते. यावर आमदार महोदय काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
Download in JPEG format