वाघोलीतील जेष्ठ पत्रकार दीपक नायक यांना धमकी
लोणीकंद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल; नायक कुटुंबाला मनसे देणार सुरक्षा

पुणे : वाघोली (ता. हवेली) येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष व पुढारीचे पत्रकार दीपक नायक यांना बातमीचा राग मनात धरून चार-पाच गाड्या घेऊन घरी येतो अशी धमकी व्हॉट्सऍपवर दिल्याप्रकरणी सुरेश सटवाजी वांढेकर याचे विरोधात नायक यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली आहे.
वाघोली येथे दीपक नायक मागील काही वर्षांपासून दै. पुढारीला बातमीदार म्हणून काम करतात. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. शनिवार (दि. १४ ऑगस्ट) रोजी पुणे-नगर महामार्गावरील चालू असलेल्या कामाबद्दल बातमी प्रकाशित झाली होती. बातमीचा राग मनात धरून सुरेश वांढेकर याने सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी दीपक नायक यांना व्हॉट्सऍपवर मेसेज करून चार-पाच गाड्या तुमच्या भावाकडे घेऊन जाणार आहे. ‘मग तुम्हाला काय करायचे ते तुम्ही ठरावा, मला काय करायचे ते मी करतो’. ‘आलोच तुमच्या घरी’ यावर दीपक नायक यांनी धमकी देता का मला असा मेसेज पाठवला. ‘काय समजायचे ते समजा’ अशी धमकी दिली. त्यामुळे दीपक नायक यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला फोनवर संपर्क करून याबाबत कळविले. त्यानंतर नायक यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला मनसेचे पदाधिकारी, वकील व पत्रकार यांच्या समावेत जाऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे. सुरेश वांढेकर याने दिलेल्या धमकीमुळे दीपक नायक यांचे कुटुंब भीतीच्या दडपणाखाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पत्रकार दीपक नायक यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मनसेच्या वतीने सुरक्षा दिली जाईल असे महाराष्ट्र राज्य विधी विभागाचे उपाध्यक्ष अॅॅड. गणेश म्हस्के यांनी सांगितले. दहशत निर्माण करणाऱ्या अशा गुंड प्रवृत्तीवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे.
चार-पाच गाड्या घेऊन घरी आलोच अशी धमकी प्रामाणिक पत्रकाराला देणे ही बाब अतिशय गंभीर आहे. अहमदनगर येथील बाळ बोठे प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी अशा गुंड प्रवृतींवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
– गणेश सातव (भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष),
– शरद आव्हाळे (भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष),
– विजय जाचक (भाजपा क्रीडा आघाडी हवेली तालुकाध्यक्ष)
वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय पुढाऱ्यांबरोबर फोटो काढून समाजामधील सर्वसामान्यांवर दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृतींवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई झाल्यास समाजामध्ये शांतता निर्माण होईल व अशा प्रवृतींना आळा बसेल.
– अॅॅड. शरद बांदल, – अॅॅड. गणेश म्हस्के