अन्य खताची गोणी खरेदी केली तरच युरियाची गोणी?
शेतकऱ्यांची आर्थिक लुट; रयत शेतकरी संघटनेची खत विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

पुणे : अन्य खताची गोणी खरेदी केल्यासच युरियाची गोणी देण्यात येईल असे अडेलतट्टू धोरण खतविक्री दुकानदारांकडून अवलंबिल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. युरियाच्या गोणीबरोबर अन्य खताची गोणी खरेदी करण्याची जबरदस्ती करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांनी कृषी विभागाकडे केली आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी पिकाची पेरणी केली. पेरणी झाल्यांनतर पिकाच्या वाढीसाठी युरिया खताची अत्यंत आवश्यकता असते. शेतकऱ्यांची गरज ओळखून खतविक्री दुकानदारांकडून अन्य खताची (अंदाजे किंमत ५०० रुपये) गोणी खरेदी केली तरच युरियाची गोणी मिळेल अशी जबरदस्ती केली जात आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच कोरोनामुळे आणखीनच आर्थिक संकटात सापडला असताना कृषी दुकानदारांकडून गरज नसताना दुसरी खताची गोणी माथी लादली जात आहे. एकीकडे सरकारने युरिया खताचा तुटवडा निर्माण होऊ देणार नाही असे जाहीर केले असताना जाणूनबुजून काही कृषी दुकानदारांकडून कृतीम तुटवडा निर्माण करून आर्थिक लुट केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना युरियाच्या गोणीबरोबर अन्य खताची गोणी खरेदी करावी लागेल अशी जबरदस्ती करणाऱ्या दुकानदारांवर कडक करावी करावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे रामदास कोतवाल यांनी कृषी विभागाकडे केले आहे.
शेतकऱ्यांना अन्य खताची गोणी घेतल्यासच युरिया गोणी देण्यात येईल अशी जबरदस्ती करणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
– सपना ठाकूर (तालुका कृषी अधिकारी)
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल कोतवाल व रामदास कोतवाल यांच्या समावेत संबधित दुकानाला भेट देऊन दुकानदाराला विचारणा केली असता दुकानदाराने उडवाउडवीचे उत्तरे दिली. याबाबत कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.
– रामदास कोतवाल (पुणे जिल्हाध्यक्ष – रयत शेतकरी संघटना)