वाघोली प्रा.आ. केंद्राच्या अंतर्गत २४८१७ बालकांना पोलिओचा डोस
जि.प. सदस्य कटके यांचे हस्ते बालकांना डोस पाजून शुभारंभ

वाघोली : वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली अंतर्गत रविवारी (३ मार्च) पार पडलेल्या पल्स पोलिओ मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेचा शुभारंभ वाघोलीतील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वाघोली आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांमधून ० ते ५ वर्ष वयोगटातील २४८१७ बालकांना २३० कर्मचाऱ्यांच्या मदतीने ७८ बुथद्वारे पोलिओचा डोस पाजण्यात आला. ज्या बालकांना पोलिओ डोस मिळाला नाही त्यांना पुढील तीन दिवसात घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे यांनी सांगितले.