सोनसाखळी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने १० गुन्ह्यांचा केला उकल; ७ लाख ६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

वाघोली : चेन स्नॅचींग करणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने कोंढवा येथे सापळा रचून पकडले आहे. त्याचेकडून सात लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.
असद उर्फ असदुल्ला माशाअल्ला जाफरी उर्फ इराणी (वय ४७ वर्षे रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचींगबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक करत असताना गुप्त बातमीदारामार्फत पोलीस शिपाई सचिन पवार यांना सोनसाखळी चोरटा वटपोर्णिमेनिमित्त पत्नीला भेटण्यासाठी कोंढवा (पुणे) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. खात्रीशीर माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या पथकाने जे. जे. पार्क कोंढवा (पुणे) येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान एका साथीदारासह गुन्हा केला असल्याची कबुली आरोपीने दिली असून त्याचेकडून ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपी व त्याच्या साथीदाकडून पुणे शहरामध्ये सोनसाखळी चोरीचे एकूण ९ गुन्हे व मोटारसायकल चोरीचा १ गुन्हा असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हयातील सोन्याचे दागिने विशाल जगदीश सोनी (रा. कोंढवा, पुणे) या सोनारास विकल्याचे सांगितले असून सोनारास गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.
सदरील कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे–२) लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.