पीएमपीएल चालकाचा खून करणारे चौघे अटकेत
चौवीस तासांच्या आत गुन्ह्याचा उकल; गुन्हे शाखा युनिट-६ ची कामगिरी

वाघोली : पीएमपीएल चालकाचा दगडाने ठेचून निर्घुण खून करून कोणताही पुरावा न ठेवता फरार झालेल्या चार नराधमांना पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने खासगी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक कौशल्याच्या आधारे चौवीस तासांच्या आत पकडण्यात यश मिळवले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रविवार दि. ११ जुलै रोजी पीएमपीएल चालक गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुखे (वय २९) यांचा खून झाल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी वेगवेगळे पथक बनवून तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार समांतर तपास चालू असताना पोना नितीन मुंढे गुप्त बातमीदारामार्फत खून करणारे आरोपी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा पळून गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने उमरगा येथील अंबिका लॉज येथून ऋषिकेश संजय बोरगावे (वय ३१ रा. फुरसुंगी, पुणे) व अक्षय हनुमंत जाधव (वय २१ वर्षे रा. हडपसर, पुणे) या दोन आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले तर पोलीस पथकातील ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार यांनी सापळा रचून अन्य सह आरोपी प्रज्वल सचिन जाधव (वय २० रा. हडपसर), तुषार सुर्यकांत जगताप (वय २१ रा. हडपसर) यांना हडपसर (पुणे) परिसरातून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पीएमपीएल चालक अमोल साळुखे यांचा खून केला असल्याची आरोपींनी कबुली दिली. गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने चौवीस तासांच्या आत खुनातील चार आरोपींना पकडण्यात यश मिळविले असून आकाश राठोड हा आरोपी फरार आहे. पुढील तपासकामी आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, तांत्रिक विश्लेषण विभागाचे सलीम तांबोळी व संदेश निकाळजे यांचे पथकाने केली आहे.