सुषमा अंधारे यांनी वडगावशेरी मधून निवडणूक लढवावी
येरवड्यात लागलेल्या फ्लेक्सची चर्चा; अंधारेनी तयारी दर्शवल्यास महाविकास आघाडीची समीकरणे बदलणार

वडगावशेरी : वडगावशेरी मतदार संघावर महाविकास आघाडी मधील शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) गट दावा करत आहेत. शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने हा मतदासंघ महाविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला जाणार असल्याचे निश्चित झाल्याने शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वडगांवशेरी मतदार संघातून निवडणूक लढवावी असे फ्लेक्स येरवड्यात लागल्याने चर्चेला उधाण आले आहे. सुषमा अंधारे यांनी इच्छा व्यक्त केल्यास हा मतदार संघ शिवसेनेला सोडावा लागेल. मात्र भाजपमधून राष्ट्रवादीत येऊन तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्याना अडचणीचे ठरणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठका आणि दौरे सुरू झाले आहेत. तर विद्यमान आणि इच्छुक नेत्यांनी देखील आपापल्या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी येरवडा भागात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
‘उच्चशिक्षित निर्भीड कणखर व्यक्तिमत्व वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय’ असे मजकूर असलेले फ्लेक्स अनेक भागात लावण्यात आले आहेत.
हे फ्लेक्स लावणारे ठाकरे गटाचे पुणे शहर उपशहरप्रमुख आनंद गोयल म्हणाले की मूळचा शिवसेनेचे हा मतदासंघ आहे. बाहेरील पक्षातील उमेदवार आयात करण्यापेक्षा अंधारे या सक्षम उमेदवार आहेत. यानिमित्त एका सुशिक्षित महिलेस संधी मिळेल.
पक्षाची ताकद मतदार संघात असल्याने सुषमा अंधारे यांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. मागील दीड वर्षाच्या कालावधीत सुषमा अंधारे यांनी ससून रुग्णालय ड्रग्स प्रकरण ते कल्याणीनगर अपघात प्रकरणातील घटनेला वाचा फोडण्याचे काम केले आहे.
वडगावशेरी मतदारसंघात आगामी काळात सुषमा अंधारे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यास महाविकास आघाडीची समीकरणे बदलू शकतात. अंधारे याच मतदारसंघातील धानोरी भागात वास्तव्यास आहेत. त्या उमेदवार असल्यास शिवसेनेतील संजय भोसले, नितीन भुजबळ, सतीश मुळीक या इच्छुकांना देखील शांत बसावे लागणार आहे. भाजप मधून राष्ट्रवादीत येण्यासाठी वेटिंगवर असणाऱ्या माजी आमदार बापुसाहेब पठारे, माजी नगरसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे, सुरेंद्र पठारे यांच्यासाठी देखील अडचणीचे ठरणारे आहे.
याबाबत सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.