चैन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद
नाशिक मधून घेतले ताब्यात; वाघोली पोलीस तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी

वाघोली : शहरात सोन साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना वाघोली पोलीस तपास पथकाला सोन साखळी चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरम्यान, पाच जणांची टोळी असल्याचे समोर आले असून, ते दुचाकी चोरून त्या दुचाकीवर सोन साखळी चोरत असल्याचे समोर आले आहे. तर, यातील एक नाशिक पोलिसांना तीन गुन्ह्यात पाहिजे असल्याचेही समोर आले आहे.
प्रशांत संतविजय यादव (वय १९, रा. नाशिक), कुणाल विश्वनाथ साबळे (वय २१), ताजीम सल्ला उद्दीन अन्सारी (वय २०) तसेच संजोग संतोष भांगरे (वय १८) व मनोज उदय पाटील (वय ३१, रा. सर्व नाशिक शहर) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलिसांकडे दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोशि साईनाथ रोकडे व पोशि दिपक कोकरे यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींबाबत माहिती मिळवली. त्यानूसार तपास पथकाने वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेतले. यामधील प्रशांत व ताजीम हे सराईत आहेत. नाशिकवरून पुण्यात येऊन वेगळ्या भागातून दुचाकी चोरत होते. नंतर त्याच दुचाकीवरून ते चोऱ्या करत होते. दरम्यान, ताजीम अन्सारी हा नाशिक पोलिसांना पाहिजे आहे. त्याच्यावर गंगापूर, म्हसरूळ व सातपूरा पोलिसांत गुन्हे नोंद आहेत. प्रशांत यादव हा सराईत आहे. प्रशांतने कुणाल साबळेच्या मदतीने दौंडमधून एक दुचाकी चोरली आणि वाघोलीत त्याच दुचाकीवरून दोघांनी सोन साखळी हिसकावली. तर, दुसऱ्या घटनेत त्याने ताजीम अन्सारी याच्या साथीने कोरेगाव पार्क व विमाननगर परिसरात सोन साखळी हिसकावल्याचे समोर आले. चोरलेले सोने त्यांनी मित्र संजोग व मनोज यांच्याकडे दिले होते. त्यांनाही पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरीचे सोने जप्त केले आहे.
ताजीम, संजोग, मनोज यांना पुढील कार्यवाहीसाठी विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोह बाबासाहेब मोराळे, पोह प्रदिप मोटे, पोह रामचंद्र पवार, पोशि समीर भोरडे, पोशि दिपक कोकरे, पोशि साईनाथ रोकडे, पोशि पांडुरंग माने, पोशि विशाल गायकवाड, पोशि मंगेश जाधव, पोशि राजाराम अस्वले, पोशि शिवाजी सालके, पोशि शिवाजी चव्हाण, पोशि प्रितम वाघ यांनी केली आहे.