वडगावशेरीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन होणार महायुद्ध

मुळीक-पठारे-टिंगरे मध्ये घमासन

वडगांवशेरी : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दावा केला आहे. सध्या या मतदार संघात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सुनील टिंगरे आमदार असल्याने महायुतीत वादाची शक्यता आहे. मात्र महायुतीत जागा वाटप होण्याआधीच जगदीश मुळीक यांनी आगामी विधानसभा निवडणूक वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचा दावा केला आहे. तसे फ्लेक्स मुळीक यांच्या समर्थकांकडून मतदारसंघात लावण्यात आले आहेत.
२०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे जगदीश मुळीक यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. तर २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून बापुसाहेब पठारे विजयी झाले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे विजयी झाले. या मतदारसंघातून एकदा विजयी झालेले भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक हे आता विधानसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जगदीश मुळीक हे लोकसभेसाठी देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मुळीकांची लोकसभेची नाराजी विधानसभेला भाजप तिकिट देऊन दूर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार जगदीश मुळीक यांची तळागाळातील सर्वसामान्यांशी जोडले गेलेली नाळ व त्यांनी केलेली विविध विकास कामे यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तर सध्या या मतदार संघात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सुनील टिंगरे आमदार असल्याने महायुतीत वादाची शक्यता आहे. त्यामुळे वडगावशेरी मतदारसंघावरून महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता आहे.
सुनील टिंगरेंचा विचार होणार का? 
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षाचा झालेल्या पराभवामुळे विधानसभेला दादांच्या पारड्यात किती जाग पडतील याची खात्री देणे शक्य नाही. त्यामुळे वडगावशेरी विधानसभेची जागा मिळेल की नाही याविषयी शंका आहे. दुसरीकडे सुनील टिंगरे यांच्यावर पक्षाची नाराजी असल्याच्या चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे. जरी उमेदवारी दिली तरी पोर्शे प्रकरणानंतर मतदार कौल देतील का? असा देखील सवाल आहे. त्यामुळे त्यांच्या ऐवजी अन्य उमेदवाराचा विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुतारी कोण हातात घेणार 
जगदीश मुळीक यांच्या सोबत सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले माजी आमदार बापुसाहेब पठारे, माजी नगसेवक अनिल टिंगरे, युवा नेते सुरेंद्र पठारे हे देखील भाजप मधुन इच्छुक आहेत. मात्र ऐनवेळी हे देखील पक्ष बदलू शकतात. यांच्यात कोण सर्वप्रथम तुतारी हातात घेणार याकडे लक्ष लागले आहे. तर राष्ट्रवादी मधून सुनील टिंगरे यांची उमेदवारी नाकारल्यास वरील इच्छुकांपैकी कोण घड्याळ हातात बांधू शकते अशी परिस्थिती सध्या मतदारसंघात आहे. वडगावशेरी मतदारसंघातून एकदा झालेला आमदार पुन्हा होऊ शकत नाही अशी चर्चा आहे. शिवसेना उबाठा गटाकडून माजी नगरसेवक संजय भोसले इच्छुक आहेत. महाविकास आघाडी मध्ये हा मतदार संघ शिवसेना उबाठा गटाला सुटेल अशी चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील या मतदारसंघावर दावा करत असल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
एकंदरीतच मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत काय चित्र राहणार हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्यातरी केवळ राजकीय चर्चांना उधाण येत आहे.

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button