वाघोली परिसरात साडे पाच दिवसात १७२.५ मिलीमीटर पावसाची नोंद
मे महिन्यात दोन हजार टक्के पेक्षा जास्त पाऊस

वाघोली : पावसाला सुरु होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने पुणे शहरात जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर उपनगरांमध्ये देखील असून वाघोली परिसरात संपूर्ण मे महिन्यात २५ मे सकाळी साडे अकरा पर्यंत हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार १९८.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २० मे ते २५ मे रोजी सकाळी साडे अकरा पर्यंत सुमारे १७२.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी (दि.२५) दिवसभर पाऊस सातत्याने वाघोली परिसरात पडत होता त्यामुळे २१० मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद होणार आहे. अष्टापूर व परिसरामध्ये मे महिन्यात १५०.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मे महिन्यात वाघोलीत पडणाऱ्या (९.७ मिलीमीटर) एकूण सरासरीच्या २०४२.३ टक्के पावसाची नोंद २५ मे सकाळी साडे अकरा पर्यंत आतापर्यंत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
धुंवाधार पावसामुळे वाघोलीत पुणे-नगर महामार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना मागील सहा दिवसांमध्ये समोर आल्या आहे. अनेक सखोल भागात पाणी साचत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीनुसार महापालिकेच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहे.