चुकीच्या बिलांमुळे वीज ग्राहक त्रस्त
चुकीचे मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीवर कारवाई करा : माजी उपसरपंच संदिप सातव यांची निवेदनाद्वारे मागणी

वाघोली : वीज महावितरण कंपनीकडून अनेक विज ग्राहकांना खोटी व चुकीची बिल देण्यात येत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिल रीडिंग घेणाऱ्या एजन्सीजवर कारवाई करून वाघोली महावितरण कार्यालयामध्ये स्वतंत्र बिल दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी माजी उपसरपंच संदीप सातव यांनी महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वीज वितरण कंपनीच्या एजन्सींकडून चुकीचे मीटर रीडिंग घेतल्या जात असल्याने वीज ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खरे तर एजन्सीने दिलेले मीटर रिडींगचे बिलिंग तयार करण्यापूर्वी महावितरण कर्मचाऱ्यांनी प्रमाणित करणे गरजेचे आहे. परंतु एजन्सीने घेतलेले मीटर रीडिंग प्रमाणित न केल्यामुळे वीज ग्राहकांना रेसकोर्स हडपसर येथील विज महावितरण कार्यालयात जाऊन दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे वीज ग्राहकांना वेळेबरोबरच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
एजन्सीचे कर्मचारी खोटी व चुकीचे रिडिंग घेत असल्याने जून महिन्यामध्ये मोठ्याप्रमाणामध्ये ग्राहकांच्या वाढीव बिलाबाबत तक्रारी वाढले आहेत. रेस्कोर्स (हडपसर) कार्यालयात जाण्यासाठी सामान्य वीज ग्राहकांना कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. बिल दुरुस्तीसाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागतात. त्यामुळे सामान्य ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. चुकीचे बिल रीडिंग घेणाऱ्या एजन्सीमुळे ग्राहकांमधून महावितरणच्या कामाबाबत चीड निर्माण झाली आहे.
ग्राहकांचे एप्रिल २०२४ ते जून २०२४ या काळातील बिलांची विभागणी करून देण्यात यावीत तसेच रीडिंग एजन्सीने चुकीचे रीडिंग घेतल्याबाबत त्यांची मान्यता रद्द करून योग्य ती कारवाई करावी. त्याचबरोबर हडपसर ग्रामीण उपविभागीय कार्यालयातील बिलिंग स्टाफने फोटोचे प्रमाणीकरण (validation) न केल्याबद्दल व रीडिंग एजन्सीवर कुठलाही अंकुश नसल्याने संबधित कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच वाघोली विज वितरण कार्यालयामध्ये बिल दुरुस्तीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमणुक करावी अशी मागणी वाघोलीची माजी उपसरपंच यांनी निवेदनाद्वारे वीज महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे केली आहे.
मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीवर योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच मीटर रिडींग घेणारे एजन्सीवर मॉनिटरिंग न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे व वाघोली कार्यालयात बिल दुरुस्तीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचे आदेश कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहेत.– राजेन्द्र पवार (मुख्य अभियंता, विज महावितरण, पुणे)