आमदार कटके यांनी घेतली पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेट
नगर महामार्गावरील वाहतुक कोंडी व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केली चर्चा

वाघोली : शिरूर-हवेली मतदार संघात पुणे नगर महामार्गावर होणारी वाहतुक कोंडीबाबत व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेट घेऊन समस्यांबाबत चर्चा केली.
आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होत असल्याने या पार्श्वभूमीवर, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि भाविकांच्या सुविधा यांचे सुयोजन करणे गरजेचे असल्याने आमदार कटके यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक, रस्ते तपासणी, वाहतूक मार्गांची पुन्हा आखणी आणि अडथळे टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यावर भर दिला. तसेच वैद्यकीय सुविधा, पाण्याची उपलब्धता, स्वच्छता गृह आणि विश्रांतीस्थळांची उभारणी यावरही त्यांनी लक्ष वेधले.
त्याचप्रमाणे नगर रोड भागात वाढणारी लोकसंख्या व वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या बनली आहे. त्यानुसार वाहतूक संकेतस्थळांवर (सिग्नल) सुधारणा, झेब्रा क्रॉसिंग आणि फूटपाथ उभारणी, वाहनतळ (पार्किंग) धोरणात सुधारणा, सिसीटीव्ही नियंत्रण केंद्रांचा वापर, पोलिसांची उपस्थिती वाढवणे आदी मुद्दे सुचविले.
दरम्यान पोलीस अधीक्षक गिल यांनी आमदार कटके यांनी मांडलेल्या मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल, असे आश्वासन दिले.