Video : रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत
पावसाळी कामांची पोलखोल; वाहने बंद पडल्याने प्रचंड नुकसान

लोहगाव : सोमवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले. पुन्हा एकदा सखल भागात पाणी साचले होते. येरवडा, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पावसाळी वाहिन्या सफाईच्या कामाची पोलखोल होऊन बोजवारा उडाला आहे. मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत वाहन चालकांना जावे लागले. पाणी गाड्यांच्या सायलेन्सर मध्ये जाऊन गाड्या बंद पडून प्रचंड नुकसान झाले. मनपाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पूर्व भागात सोमवारी (दि. २६ मे) दुपार नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे पावसाळी वाहिन्या कुचकामी ठरल्याने सखल भागात पाणी साचले होते. लोहगाव-वाघोली रस्ता कर्मभूमी नगर, योजना नगर, लोहगाव मुख्य बस थांबा, खराडी, येरवडा गुंजन चौक, अग्रेसन शाळेजवळील रस्ता, विमानतळ रस्ता, वडगावशेरी विठ्ठलाचं डेअरी याठिकाणी पाणी साचून होते. पाऊस गेल्यानंतरही मुख्य रस्त्यांवर पाणी काही तास थांबून होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणीही कर्मचारी आले नाही. त्यामुळे पाण्यातूनच वाहन चालकांना मोठी कसरत करत वाट काढत जावे लागत आहे. अनेकांना पाण्यात पडून अपघाताला सामोरे जावे लागले आहे. तर गाड्यांमध्ये पाणी जाऊन गाड्या बंद पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्यावर नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे
जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साचले आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी टीम पाठवल्या आहेत. कर्मभूमी, योजना नगर याठिकाणी नाल्याची कामे सुरू आहेत. पावसामुळे काम अर्धवट आवस्थेत आहेत.
– विनायक शिंदे (उपअभियंता, मलनिसारण विभाग, मनपा )