रोहीत्रांमधील तारा चोरणारी टोळी जेरबंद
शिक्रापूर गुन्हे शोध पथकाची कामगिरी; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; ११ गुन्हे उघडकीस

शिक्रापूर : शेतातील महावितरणच्या विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळी शिक्रापूर गुन्हे शोध पथकाने जेरबंद केली आहे. त्यांचेकडून बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सागर शिवराम जाधव (वय ३० रा. म्हाळुंगे पडवळ, ता.आंबेगाव, जि.पुणे), राजु प्रभु पारधी (वय ४० रा. जवळके बु. ता.खेड, जि.पुणे), राहुल संतोष मधे (वय २५ रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), किरण गोवीद खंडागळे (वय ३० रा. जवळके बु. ता.खेड, जि.पुणे), पांडुरंग दशरथ वायकर (वय ४० रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतातील विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मागील तीन महीन्यांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे विद्युत शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. विद्युत रोहीत्र चोरीनंतर शेतकऱ्यांची पाण्याविना पिके जळून जात असल्याने शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. विद्युत रोहीत्र चोरी करणाऱ्या चोरट्यांनी शिक्रापूर पोलिसांपुढे मोठे उभे केले होते. विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी शिक्रापूर गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला होता.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन माहीती काढली. अखेर पोलिसांनी विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफास केला. आरोपींना ताब्यात घेवून पोलिसांनी चौकशी केली असता तांब्याच्या ताराची चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून १ इको कार, १ पिकअप गाडी, १ पल्सर मोटार सायकल यासह गुन्हयातील चोरलेले तब्बल १९० किलो विद्युत रोहीत्रामधील तांब्याच्या तारा असा एकुण ११ लाख ९५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकुण ११ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष मारकड हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांचेसह ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोह श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, संतोष मारकड, पोकॉ नारायण वाळके यांनी केली आहे.