दुसऱ्याशी लग्न केल्याच्या रागातून महिलेचा खून
विश्रांतवाडी पोलीसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला घेतले ताब्यात
विश्रांतवाडी : जुन्या प्रेम संबंधातून प्रियकराने विवाहित प्रेयसीचा पाठलाग करून तिच्या डोक्यात कोयत्याचे सपासप वार करून खून केला. खून करून आरोपी पळून जात असताना विश्रांतवाडी पोलीसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. खुनाची घटना कळस येथे मंगळवारी (दि. १७ सप्टेंबर) रात्री घडली.
गौरी लणेश आरे (वय २५, सध्या रा. लक्ष्मीकुंज सोसायटी, कळस) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पती लणेश आरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अमोल कांबळे (वय.२५, रा.श्रमिक नगर, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. त्यास सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विश्रांतवाडी पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत गौरी व आरोपी आमोल यांचे टिंगरे नगर मधील शाळेत असताना प्रेम संबंध होते. दोघेही लग्न करणार होते. मात्र गौरी ही मूळ गावी रत्नागिरी येथे गेल्यानंतर तिने दुसऱ्याच मुलांशी लग्न केले. याचा राग आरोपी अमोल यास होता. गौरी भावाकडे कळस येथे आल्याची माहिती आरोपी अमोल याने गौरीच्या स्टेटस वर बघितली. त्यानंतर धारधार कोयता घेउन अमोल तिच्या मागावर होता. गणपती विसर्जनच्या दिवशी गौरी जात असताना रिक्षात दबा धरून बसलेल्या अमोलने तिच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी महिलेला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. पण बुधवारी सकाळी उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपी अमोल हा पळून जात असताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्या कडील तपास पथकाचे पोलिस कर्मचारी संपत भोसले याने शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.