लोहगावात जंबो अतिक्रमण कारवाई
२० हजार फूट बांधकामांवर हातोडा

लोहगाव : लोहगाव-वाघोली रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या संत नगर येथील पक्क्या स्वरूपाच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. प्रथमच मोठा फौज फाटा घेऊन महापालिकेने सुमारे २० हजार स्केवर फूट पक्क्या स्वरुपाच्या बांधकामांवर जॉ कटर, जेसीबीच्या साह्याने कारवाई केली. त्यामुळे रस्ता मोठा दिसत असून लवकरच पक्का स्वरुपाचा रस्ता होणार आहे.
लोहगाव-वाघोली रस्ता हा २४ मीटरचा राज्य मार्गातील रस्ता आहे. मात्र संत नगर येथे अतिक्रमणामुळे पूर्णतः व्यापून गेला होता. यामुळे सतत या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. आमदार बापुसाहेब पठारे हे या रस्त्याचे रूंदीकरण होण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. गेल्या मंगळवारी देखील बस स्टॉप, वॉटर पार्क रस्ता, डीवाय पाटील कॉलेज रस्त्यावरील स्टॉलवर कारवाई झाली होती.

रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे बांधकामे, दुकान यांना महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज महापालिकेच्या जुन्या हद्दीतील २४ मीटर रस्त्यावर अतिक्रमण करून बांधलेल्या पक्क्या स्वरुपाच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. कैलास मिसळ पासून ते संत नगर मधील इंडीयन ऑईल पेट्रोल पंप पर्यंत एका बाजूला जुन्या हद्दीत कारवाई करण्यात आली. २० हजार स्केवर फूट बांधकाम पाडण्यात आले.
या कारवाईमध्ये बांधकाम विभागाचे उप अभियंता श्रमिक शेवते, शाखा अभियंता नितीन चांदणे, कनिष्ठ अभियंता अभिजित कुसाळकर, संग्राम पवार, पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील पोपळे, पथारी अतिक्रमण विभागीय निरिक्षक शाम अवघडे, अतिक्रमणं विभागाकडील पोलीस निरिक्षक, पोलीस कर्मचारी, जॉ कटर, जेसीबी अशा मोठ्या फौज फाट्यात कारवाई करण्यात आली. कारवाईच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
एकाच बाजूला कारवाई
जुन्या हद्दीत एकाच बाजूला अतिक्रमण कारवाई झाली. नव्याने समावेश झालेल्या दुसऱ्या बाजूने देखील कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र आज झाली नाही. पुन्हा नव्याने उर्वरित बाजुला देखील लवकरच कारवाई घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले.