खराडीत रंगणार जंगी कुस्त्यांचा आखाडा
महाराष्ट्रासह विविध राज्य व परदेशातूनही सहभागी होतात नामांकित मल्ल

पुणे : खराडी-चंदननगर मधील श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सवा शनिवार दिनांक २२ व रविवार दिनांक २३ मार्च दरम्यान होत आहे. यानिमित्त दिनांक २३ मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कै. राजाराम पठारे-पाटील विद्यालयाच्या प्रांगणात कै. पै. विठोबा पठारे इनडोअर स्टेडियमध्ये लाल मातीत या कुस्त्या होणार असल्याची माहिती आखाडाप्रमुख माजी नगरसेवक महादेव पठारे-पाटील तसेच ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव पठारे यांनी दिली.
उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी निकाली कुस्त्यांचा आखाडा आयोजित केला असून त्यासाठी ४० लाख रुपये रोख इनाम देण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देताना आखाडा प्रमुख महादेव पठारे म्हणाले, आमदार बापूसाहेब पठारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते पंढरीनाथ आण्णा पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती स्पर्धा होत असतात. खराडीतील आखाड्याचा उल्लेख देशभरातील नामांकित आखाड्यांमध्ये होतो. दिल्ली, हरियाणा, इंडियन आर्मी, पंजाब, महाराष्ट्र अशा विविध राज्यांसह परदेशातूनही नामांकित मल्ल या कुस्ती आखाड्यात सहभागी होत असतात. शिस्तबद्ध चालणाऱ्या या आखाड्यामध्ये पैलवानाची विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था आमदार बापूसाहेब पठारे तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते आण्णासाहेब पठारे यांच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. युवा नेते सुरेंद्र पठारे यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी पैलवानांचा रोख रक्कम देऊन विशेष सन्मान केला जातो.
यावर्षीच्या आखाड्यामध्ये प्रथम इनामाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध हरियाणा इंडियन आर्मीचा भारत केसरी पै. विशाल बोंदू यांच्यात निकाली होणार आहे. द्वितीय इनामाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर विरुद्ध जागतिक विजेता इराणचा पै. आदी इराणी यांच्यात होईल. तृतीय इनामाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर यांच्यात होणार आहे. यासह विविध अनेक कुस्त्या आखाड्यात पहायला मिळणार आहेत.
रविवारी लाल मातीत रंगणाऱ्या या कुस्त्यांसाठी आखाड्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आखाड्याची पाहणी आखाडा प्रमुख माजी नगरसेवक महादेव पठारे-पाटील, काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव पठारे-पाटील, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, माजी अध्यक्ष राहुल पठारे, कैलास पठारे, कार्याध्यक्ष पंढरीनाथ गरुड, बाळासाहेब राजगुरू, लक्ष्मण आण्णा पठारे, अरुण पठारे, प्रसाद पठारे, कुस्ती कोच विलास कंडरे आदी मान्यवरांनी मान्यवरानी केली.
रविवारी दुपारी १ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आण्णासाहेब पठारे यांच्या हस्ते आखाड्याचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सायंकाळ पर्यंत निकाली कुस्त्या कुस्ती शौकिनांना पहाता येणार आहेत. कुस्त्या पहाण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीकाळभैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.