वाटसरूंना लुटणारी टोळी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाची कामगिरी; दोन जबरी चोरीचे गुन्हे उघड

पुणे : रात्रीच्यावेळी पालघनचा धाक दाखवून वाटसरूंना लुटणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने संगमवाडी परिसरातून जेरबंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-४ चे पथक पुणे शहरातील विविध दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना पोलीस अंमलदार, विनोद महाजन व नागेशसिंग कुँवर यांना बातमीदारामार्फत विमाननगर येथील सिम्बॉयसिस कॉलेज जवळ व कल्याणीनगर येरवडा येथे रात्रीच्यावेळी धारधार शस्त्राचा धाक दाखवून गुन्हे करणारे तीन आरोपी संगमवाडी येथील पार्किंग-३ मध्ये बसले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच युनिट-४ च्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून साहिल उर्फ मोबासाई समीर शेख (वय २१ रा. येरवडा) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता इतर दोन फरार असलेल्या साथीदारांच्या मदतीने विमाननगर व येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली.
आरोपींनी गुन्ह्य करण्याकरीता वापरलेली पालघन व चोरी गेलेला १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. युनिट-४ च्या पथकाने दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून पुढील कारवाईकरीता विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुका (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उप-निरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, पोलीस अंमलदार संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन, नागेशसिंग कुँवर, स्वप्निल कांबळे यांनी केली आहे.