पोस्टमन नामदेव गवळी महाराष्ट्रातून प्रथम
पोस्टल लाईफ इंशुरन्स योजनेच्या प्रसारसत्रामध्ये पटकावला क्रमांक

वाघोली : वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी यांचा भारतीय डाक विभागाने घेतलेल्या पोस्टल लाईफ इंशुरन्स योजनेच्या प्रसारसत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आला आहे.
पोस्टमन गवळी हे वाघोली आणि आसपासच्या गावांमध्ये घरोघरी जाऊन, शाळा, महाविद्यालय, वाड्या-वस्त्या तसेच कारखाने, कंपन्या इ. ठिकाणी जाऊन भारतीय डाक विभागाच्या लाभदायक योजनांचे माहितीसत्र घेत असतात. त्यातूनच जनसामान्यांना या योजनांचा थेट लाभ व्हावा यासाठी ते पोस्टल योजनांचे तसेच आधार कार्डचे शासकीय दरात मेळावे घेत असतात.
दरम्यान विमाक्षेत्रात कमीत कमी हप्ता आणि जास्तीत जास्त बोनस मिळवून देणारा पोस्टल लाईफ इंशुरन्स जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय डाक विभाग वेळोवेळी या योजनेचे अभियान राबवत असते. हा विमा २० हजारांपासून ते ५० पन्नास लाखांपर्यंत घेता येतो. याबाबत एक, तीन व सहा महिन्याला तसेच वर्षाला हप्ते असतात. सामान्यांना परवडेल आणि जास्तीत जास्त फायदा मिळेल अशी रचना असणारा लाईफ इंशुरन्स खात्रीशीर परतावा देतो. शिवाय आयकरात सवलत, आगाऊ हप्ते भरल्यास ३ टक्के सूट मिळते. भारताच्या राष्ट्रपतींच्या मार्फत असणारा पोस्टल लाईफ इंशुरन्स जनसामान्यांपर्यंत जावा यासाठी पोस्टमन गवळी सतत लोकांपर्यंत याची माहिती पोहचवत असतात. त्यातून घेण्यात आलेल्या अभियानामध्ये त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आला आहे. वरिष्ठ पोस्टमास्तर, पुणे जीपीओ यांच्याकडून त्यांना उत्कृष्टता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशासाठी प्रवर डाक अधिक्षक डॉ. अभिजीत इचके, वरिष्ठ पोस्टमास्तर प्रमोद भोसले, डाक निरीक्षक प्रमोद भोगाडे आणि पोस्टल लाईफ इंशुरन्स विभागाचे प्रमुख संदिप रेपे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे पोस्टमन गवळी यांनी सांगितले.