दोनशे पुस्तकांची वाचन पेटी शाळेला भेट
लोकसाहित्यिक बशीर मोमीन यांच्या स्मरणार्थ मोमीन कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम
वडगावशेरी : शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी याकरता लोकसाहित्यिक बशीर मोमीन यांच्या स्मरणार्थ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील दोनशे पुस्तके भेट देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
विमाननगर येथील श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्थेच्या सचिव किरण तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गोरोबा बालविद्यानिकेतन प्रशालेत नुकताच हा समारंभ पार पडला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश पाटील, अन्वर मोमीन, ज्योती एडके, कुंदा पाचोरे, अण्णा गरुड, ज्योती खंबायत, विमल बळीद, तेजस बुरुड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक सतीश पाटील म्हणाले, लोकशाहीर बशीर मोमीन यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांचे प्रबोधन करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी वेचले. महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. या सोबतच त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्यांच्या नावाने विद्यार्थ्यांना भेट मिळालेली मराठी भाषेतील पुस्तके हे खरे त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणावे लागेल.
अन्वर मोमीन म्हणाले, शालेय वयात अवांतर वाचनाची पुस्तके वाचायला मिळाल्यास विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागते या हेतूने सदरचा उपक्रम राबवला.