Video: वाघोली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्तारोको
सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा करण्याची मागणी

- शुक्रवारी (दि. १६ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने केसनंद फाट्यावरील चौकीमध्ये रास्तारोको आंदोलन करण्यासाठी रीतसर परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु पोलिसांकडून रास्तारोको करणेबाबत परवानगी देण्यात टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे मराठा समाज अजूनच आक्रमक झाला आणि जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत पोलीस चौकीसमोरच उपोषण करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी मराठा बांधवांशी चर्चा करून परवानगी दिली व निवेदन स्वीकारले.
वाघोली : राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा करून ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणाचा आज सातवा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय खालावली असल्याने त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रास्तारोको करण्यात आला. यावेळी “एक मराठा लाख मराठा”, “जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी लोणीकंद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मराठा समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त करत रास्तारोको केला. शासनाने तात्काळ सगेसोयरे अधिसूचनेचा कायद्यासह अन्य मागण्या मान्य कराव्या अशी मागणी यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. रास्तारोकोमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रास्तारोको आंदोलनामध्ये मराठा बांधवांसह मोठ्यासंख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या.