खराडी-शिवणे रस्ता पूर्ण करण्यासाठी बापूसाहेब पठारे आग्रही
पुणे मनपा आयुक्तांसोबत विस्तृत चर्चा
पुणे : वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेवून खराडी-शिवणे या रस्ता प्रकल्पातील रखडलेले भुसंपादन, निधी, कामाची सद्यस्थिती यावर विस्तृत चर्चा केली. खराडी-शिवणे नदीपात्रातील प्रलंबित रस्ता लवकरच मार्गी लावावा अशी आग्रहाची भूमिका मांडली. मनपा चर्चेनंतर प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली. महानगरपालिका प्रशासनाकडून काही दिवसांत या प्रकल्पाची पाहणी होणार असल्याची माहिती आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली.
बुधवारी (दि. २७ नोव्हेंबर) पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच इतर अधिकाऱ्यांची आमदार बापूसाहेब पठारे यांनी भेट घेतली. भेटी दरम्यान, खराडी-शिवणे या रस्ता प्रकल्पातील रखडलेले भुसंपादन, निधी, कामाची सद्यस्थिती यावर विस्तृत चर्चा केली.
मागील काही वर्षांत वडगावशेरी मतदारसंघात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी वाहनांची संख्या व वाहतूक कोंडी त्याच पटीने वाढली आहे. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी हा नागरिकांपुढे निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे. यावरच तोडगा काढण्यासाठी खराडी-शिवणे हा नदीपात्रातील प्रलंबित रस्ता पूर्ण करण्यासाठी नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
खराडी-शिवणे हा रस्ता प्राधान्याने पूर्ण करणे फार गरजेचे आहे. हा पर्यायी रस्ता वाहतूक कोंडी लक्षणीयरित्या कमी करू शकतो. पालिका प्रशासनाच्या सहकार्याने हे काम लवकरात लवकर पूर्णत्वाला नेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मागील १० वर्षांत रस्त्याच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष आणि चालढकलीमुळे नागरिकांना झालेला त्रास येणाऱ्या काळात कमी होईल. पालिका प्रशासनचाही या कामात मोठा हातभार लागणार असून तत्परतेने हे काम करण्यावर भर देणार आहे.
– बापूसाहेब पठारे (आमदार, वडगावशेरी)