पराभूत उमेदवार टिंगरे यांना लोहगाव मधून मताधिक्य

वडगावशेरीत नोटाला सर्वाधिक पसंती

वडगावशेरीवडगावशेरी मतदारसंघात चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे ४७१० मतांनी विजयी झाले. महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा निसटता पराभव झाला. मात्र पूर्ण लोहगाव मधून सुनील टिंगरे यांना ३८१२ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. तर मतदारसंघात शेवटच्या टोकाला असलेल्या वडगाव शिंदे, निरगुडी या ग्रामीण पट्ट्याने पठारे यांना मताधिक्य दिले आहे.

नव्याने पुणे महापालिकेत समावेश झालेल्या लोहगावमध्ये सुनील टिंगरे यांनी आमदार निधीतून १७५ कोटींची विकास कामे केली. पठारे हे देखील २००९ ते २०१४ या दरम्यान आमदार असताना त्यांनी देखील विकास कामे केली होती. याशिवाय त्यांचा असलेला संपर्क, नाती-गोती आणि प्रचाराची यंत्रणा पहाता  लोहगाव मधून पठारे यांना अधिक मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा आल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक, बजरंग दल, भाजपा या सर्व हिंदुत्ववादी संघटना प्रचारात उतरल्याने सोसायटीतील मतदार हा महायुतीचे उमेदवार टिंगरे यांच्याकडे वळाला.

लोहगाव मधील केंद्र क्रमांक ५ ते ४९ व ८६ ते ९३ या केंद्रांवर एकुण पठारे व टिंगरे यांना ३४ हजार ५१६ इतके मतदान झाले. यापैकी विजयी उमेदवार बापू पठारे यांना १५ हजार ३५२ तर सुनील टिंगरे यांना १९१६४ इतके मतदान झाले आहे. लोहगाव मधून टिंगरे यांना ३ हजार ८१२ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. तर निरगुडी सारख्या ग्रामीण भागामध्ये पठारे यांना ३८६ तर टिंगरे यांना २२९ मते मिळाली. वडगाव शिंदे या गावांमध्ये पठारे यांना १४७५ तर टिंगरे यांना ७२२ मते मिळाली. वडगाव शिंदे गावात पठारे यांनी ७५३ मतांचे मताधिक्य घेतले.

पैसा जिंकला, विकास हरला – टिंगरे

विकास कामांच्या जोरावर मी निवडणूक लढवली यामध्ये मतदारांची चांगली साथ मिळाली. मात्र माझा निसटता पराभव झाला. पैसा जिंकला, विकास हरला असल्याचे टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले. आगामी काळात विकास कामे करत रहाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

वडगावशेरीत नोटाला सर्वाधिक पसंती

वडगांवशेरी मतदार संघात एकुण २ लाख ८३ हजार इतके मतदान झाले. यापैकी ४ हजार ११२ जणांनी नोटाचे बटण दाबले. १६ उमेदवारांपैकी एकासही पसंती दिली नाही. तर ट्रंपेट या चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या चंद्रकांत सावंत यांना ३१९५ इतके मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार बापू भवन पठारे यांना १२५९   मते मिळाली. दोन नंबरला राहिलेले टिंगरे यांना १ लाख २८ हजार ६०८ तर विजयी उमेदवार पठारे यांना १ लाख ३३ हजार १७७ मते मिळाली. 

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button