वाघोलीत ३९ हजार ५८३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
वाघोलीत ५८.२० तर आव्हाळवाडीत ७०.६ टक्के मतदान
वाघोली : वाघोली, आव्हाळवाडी येथे शांततेत मतदान झाले. वाघोलीसह आव्हाळवाडी येथे सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर आबा कटके व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्यात चांगलीच चुरशीची लढत झाली. मागील काही दिवसांपासून चालू असलेली रणधुमाळी थंडावली असून बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येत्या २३ तारखेला गुलाल कोण उधळणार याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वाघोलीतील मतदान केंद्रावर पहाटे सात वाजेपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरीक येत होते. मात्र थंडी असल्याने तुरळक गर्दी होती. आठ वाजेच्या नंतर मतदान केंद्रावर गर्दी होत होती. वाघोली येथे ६८,००५ मतदारांपैकी ३९,५८३ मतदारांनी हक्क बजावला. तर आव्हाळवाडी येथे ६५०० मतदारांपैकी ४५८९ मतदारांनी हक्क बजावला. वाघोलीत ५८.२० टक्के तर आव्हाळवाडीत ७०.६ टक्के मतदान झाले.
आव्हाळवाडी येथे तलाठी, शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व ग्रामपंचायत प्रशासनाकडून उत्तम नियोजन करण्यात आले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाघोलीसह आव्हाळवाडी येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आव्हाळवाडीत मतदारांनी सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान केले. युवकांसह जेष्ठ नागरिक, महिला यांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.
– सचिन आव्हाळे (सामाजिक कार्यकर्ते)