Video: चंद्रकांत टिंगरे यांच्या गाडीवर हल्ला
हल्ल्यात टिंगरे जखमी; सुनील टिंगरे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला घडवून आणल्याचा रेखा टिंगरे यांचा आरोप
धानोरी : प्रभाग क्रमांक एक कळस-धानोरीच्या माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर चार अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये टिंगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा हल्ला महायुतीचे उमेदवार आमदार सुनील टिंगरे यांच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणला असल्याचा आरोप माहविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे, रेखा टिंगरे यांनी केला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी हा प्रकार घडल्याने वडगावशेरी मतदारसंघात प्रचंड खळबळ माजली आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत टिंगरे हे धानोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल वरून आपल्या इनोव्हा या चार चाकी गाडीतून जात होते. त्यांची गाडी त्यांचा चालक चालवत होता. धानोरी येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ गाडी आले असता तोंड बांधून आलेल्या चार अज्ञातांनी टिंगरे यांच्या गाडीवर विटा, दगड फेक केली. यामध्ये टिंगरे यांच्या डोक्याला तसेच शरीरावर गंभीर दुखापत झाली आहे. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे टिंगरे हे प्रचंड घाबरले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. रुग्णालयात महाविकास आघाडीचे उमेदवार बापुसाहेब पठारे, जेष्ठ नेते प्रकाश म्हस्के, राजेंद्र खांदवे यासह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पूर्व विभगाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.
उपायुक्त हिम्मत जाधव म्हणाले, चार जणांनी हल्ला घडवून आणल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करून घेऊन पुढील तपास केला जाईल.
महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे म्हणाले, विरोधकांना पराभव समोर दिसू लागल्याने ते आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले करू लागले आहेत. पण अशा प्रकारानी निवडणुका जिंकता येत नाहीत. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो.
रेखाताई टिंगरे म्हणाल्या, माझ्या पतीवर उमेदवार सुनील टिंगरे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी अशा प्रकारचा हल्ला घडवून आणला आहे.