बापूसाहेब पठारे यांना प्रीतम खांदवे पाटील यांचा जाहीर पाठिंबा
लोहगाव परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे वाढले बळ
पुणे : वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांना लोहगावच्या माजी उपसरपंच प्रीतम प्रतापराव खांदवे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या महत्त्वपूर्ण पाठिंब्यामुळे लोहगाव परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाले असून विधानसभा निवडणुकीत जनतेच्या व्यापक समर्थनाने विजय संपादन करण्याचा आत्मविश्वास महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे.
प्रीतम खांदवे पाटील यांनी बापूसाहेब पठारे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन आपले समर्थन व्यक्त केले. खांदवे यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल बापूसाहेब पठारे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, लोहगावच्या जनतेच्या सेवेसाठी मी नेहमीच कार्यरत होतो व या पुढेही राहणार असून त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
बापूसाहेब पठारे यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून प्रीतम खांदवे पाटील यांचा पाठिंबा मिळाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पाठिंब्यामुळे लोहगाव परिसर व वडगावशेरी मतदारसंघात आघाडीला अधिक बळकटी मिळाली असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
बापूसाहेब पठारे हे एक अनुभवी, कर्तव्यनिष्ठ आणि समाजाच्या हितासाठी कार्य करणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरात अनेक विकासकामे झाली आहेत व पुढेही होतील अशी आम्हाला खात्री आहे.
– प्रीतम खांदवे पाटील (माजी उपसरपंच, लोहगाव)