दोन वाहन चोरट्यास अटक
गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाची कामगिरी; वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस
पुणे : वाहन चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला सापळा रचून गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एकूण एक लाख पंच्यात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संदीप बाबुलाल यादव (वय ३० रा होळकरवाडी पुणे), गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे (वय २४ रा. गंगानगर हडपसर पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ निरीक्षक यांच्या आदेशान्वये हडपसर व परिसरात झालेल्या वाहन चोरीच्या अनुषंगाने दोन तपास पथके तपास करत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार गोविंद उर्फ गिट्या घोडखे त्याच्या साथीदार याने दहा दिवसांपूर्वी तीन आसनी रिक्षा चोरला असून हे दोघे पुणे-सोलापूर रोडवरील अंगूरबार या हॉटेल समोर रिक्षात बसले असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच गुन्हे शाखा पाचच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून रिक्षात बसलेल्या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर दोघांनीही रिक्षा चोरी केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आणखीन एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याची दोघांनी कबुली दिली. पोलिसांनी तीन आसनी रिक्षा व एक दुचाकी जप्त केली. एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गून्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, अमित कांबळे, शशिकांत नाळे यांनी केली आहे.