नवी खडकी व वडगावशेरीतून तुतारीच्या प्रचाराला सुरुवात
नागरिकांचा मोठा सहभाग

पुणे : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी नवी खडकी तसेच वडगावशेरी येथील भैरवनाथ मंदिरात श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. तसेच भैरवनाथाच्या चरणी विजयाचे साकडे घातले. शुभारंभाप्रसंगी काढण्यात आलेल्या पदयात्रेत बहुसंख्य नागरिकांनी सहभाग दर्शवला.
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बलिप्रतिपदा व भाऊबीज सणाच्या मुहूर्त साधून शुभारंभ करण्यात आला. मागील दोन दिवसांपासून पुणे शहरातील सर्वच उमेदवारांच्या प्रचाराची धामधूम दिसून आली. प्रचाराचा शुभारंभ करताना बापूसाहेब पठारे म्हणाले की, ‘हा केवळ प्रचाराचा शुभारंभ नाही, तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा आणि माझ्या नागरिक बांधवांच्या उन्नतीचा शुभारंभ आहे. प्रचंड मोठ्याप्रमाणात माझ्या पाठीशी असलेल्या नागरिकांचा दिसणाऱ्या प्रतिसादाने विजयाची समीकरणे सोपी केली आहेत. नागरिकांचा माझ्या कार्यपद्धतीवर व दुरदृष्टीवर विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात या विकासाच्या रूपात हा विश्वास मी सार्थ करणार आहे.’
दोन्ही ठिकाणी पार पडलेल्या शुभारंभाप्रसंगी तरुण तसेच महिला वर्गापासून अबालवृद्धांपर्यंत गर्दी दिसून आली. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.