ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची – ज्ञानेश्वर कटके
वाघोलीतील मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळाव्याला उत्फूर्त प्रतिसाद
वाघोली : मी तुमच्या कुटुंबातील सदस्य असून तुम्ही माझ्यासाठी पुढील फक्त २० दिवस द्या, मी तुमच्यासाठी पुढचे पाच वर्षे देईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर माऊली कटके यांनी दिला. वाघोली येथे श्रेयश गार्डन येथे शुक्रवारी वाघोलीतील मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रचार यंत्रणेतील कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माऊली कटके बोलत होते.
वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावरील श्रेयश गार्डनमध्ये शुक्रवारी (दि. १ नोव्हेंबर) वाघोलीतील मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व महायुती प्रचार यंत्रणेतील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला वाघोलीतील बहुसंख्य मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. महायुतीचा उमेदवार ज्ञानेश्वर आबा ऊर्फ माऊली कटके यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करून परिवर्तन घडवून आणणार असल्याचा निर्धार करण्यात आला.
महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांनी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांशी निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधला. मी तुमच्या कुटुंबातील सदस्य असून माझ्यासाठी पुढील २० दिवस द्या, मी तुमच्यासाठी पुढचे पाच वर्षे देणार असल्याचा विश्वास कटके यांनी उपस्थितांना दिला. शिरूर-हवेली मतदार संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून गाफील राहू नका. तुम्ही सर्वजण माऊली कटके समजूनच गावोगावी जावून मतदार संघात चालू असलेली दडपशाही मोडीस काढा. रस्ते, पूल आदी प्रश्न अद्यापही मार्गी लागले नाहीत. वाहतूक कोंडीने वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील पांचवार्षिकमध्ये कुठलाही विकास झाला नसून जनतेला केवळ भूलथापा देण्याचे काम झाले असल्याची टिका माऊली कटके यांनी केली. घोडगंगा सह. कारखान्यातील काढून टाकलेले कर्मचारी पगार देवून पुन्हा आणण्यात आले. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही निवडणूक असून जनशक्तीचाच विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास माऊली कटके यांनी व्यक्त केला. तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जावू देणार नाही अशी ग्वाही यावेळी ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, मतदार संघात दडपशाही सुरु आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने खोटे डाव खेळतायत. खालच्या पातळीवर जावून टिका केली जात आहे. यापुढेही विरोधकांकडून खालच्या पातळीवर जावून टिका केली जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी टीकेला उत्तर न देता आपले काम प्रामाणिकपणे करा. विरोधकांनी किती जरी टिका किती केली तरी मतदार राजा सुज्ञ आहे. ही निवडणूक तुमच्या भविष्याची असून दोन पिढ्यानंतर संधी मिळाली आहे. संधीच सोन करायचं असेल तर योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. सगळ्यांनी जागरूक राहून काम करा. युद्ध असू द्या किंवा निवडणूक नियोजन महत्वाचे असते. त्यामुळे सर्वांनी नियोजन करून कामाला लागा विजय आपलाच आहे असे माऊली कटके यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी वाघोलीतील मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी मेळाव्याला लावलेली उत्स्फूर्तपणे उपस्थिती ही परिवर्तनाची नांदी आहे. मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जनसामान्यांनी महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारार्थ शिरूर-हवेलीची निवडणूक हातात घेतल्याने परिवर्तन निश्चित आहे. – मंगेश (अण्णा) सातव (अध्यक्ष, सुवर्णयुग मित्र मंडळ)