जगदीश मुळीकांना विधिमंडळात घेण्याचे फडणवीस यांचे आश्वासन
वडगावशेरी मतदारसंघात होणार दुरंगी लढत
वडगावशेरी : फॉर्म भरा असा आदेश अन् फॉर्म भरायला गेल्यानंतर भरू नये असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जगदीश मुळीक यांना आला. वडगांवशेरी मतदार संघात अनेक नाट्य पूर्ण घडामोडी घडल्या. भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले अखेर फडणवीस यांनी फोन वरून मुळीक यांना विधी मंडळात योग्य संधी दिली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. पक्षाचा एबी फॉर्म असूनही मुळीक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे वडगावशेरीची दोन्ही राष्ट्रवादीमध्ये दुरंगी लढत होणार आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदासंघातील अंतर्गत मतभेद मिटवण्यात देवेंद्र फडणवीस यांना शेवटच्याक्षणी यश आलं आहे. वडगाव शेरीमधून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यानंतरही भाजपाने नेते जगदीश मुळीक इथून निवडणूक लढवण्यास ठाम होते. मुळीक यांना भाजपाचा एबी फॉर्म मिळाला होता. फडणवीस यांच्या आदेशा नंतर मंगळवारी अर्ज भरण्यासाठी मुळीक निघाले देखील होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी फोन करत त्यांची समजूत काढली आहे.
मुळीक म्हणाले, मी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून फॉर्म भरण्यासाठी आलो होतो. पक्षाकडून मला एबी फॉर्म देखील देण्यात आला होता. मात्र प्रक्रिया सुरू असताना माझे नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे फॉर्म भरु नका. मी आता कुठलाही फॉर्म भरणार नाही मला माझ्या नेत्यांनी आश्वासित केला आहे. मला न्याय दिला जाईल, असं मुळीक यांनी सांगितलं.
मुळीक हे २०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये या मतदारसंघाचे आमदार होते. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा सुनील टिंगरे यांनी पराभव केला. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातामध्ये टिंगरे यांची भूमिका चांगलीच वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाणार अशीही चर्चा होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करत या चर्चेला पूर्णविराम दिला.
सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही मुळीक निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. या मतदारसंघात भाजपाचा पाया भक्कम असल्यानं आपल्याला उमेदवारी मिळावी अशी त्यांची आग्रही मागणी होती.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मुळीक इच्छूक होते. पण भाजपानं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानं मुळीक नाराज झाल्याची चर्चा होती. भाजपा श्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानसभेसाठी शब्द दिला होता. आता थेट मुळीक यांना विधीमंडळात घेण्याचा शब्द फडणवीस यांनी दिल्याने महायुतीच्या उमेदवारांचे काम भाजपचे कार्यकर्ते करणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.