शिरूर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
महायुतीचा उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांना निवडून आणण्याचा निर्धार

शिरूर : शिरूर-हवेलीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना जाहीर झाल्यामुळे शिरूर येथे रविवारी (दि. २७ ऑक्टोबर) विधानसभा-२०२४ च्या पार्श्वभूमीवर तालुका भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक कैं. बाबुरावजी पाचर्णे यांच्या संपर्क कार्यालय प्रांगणात संपन्न झाली. बैठकीमध्ये पक्ष आदेश मानून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांचे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी जयश्रीताई पलांडे, अॅड. धर्मेंद्र खांडरे, बाळासाहेब चव्हाण, श्रीकांत सातपुते, अॅड. सुरेश पलांडे, भगवान शेळके, प्रकाश धारीवाल, राहुल पाचर्णे, एकनाथ शेलार, सुभाष कांडगे, संजय बेंद्रे, महेश बेंद्रे, कैलास सोनवणे, शिवाजी भुजबळ, सुभाष कांडगे, सचिन मचाले, एच के काळे, अतुल दुर्गे, अनघा पाठक, प्रिया बिराजदार, रेश्मा शेख, माऊली बहिरट, पांडुरंग दुर्गे जालिंदर काळे, राहुल पवार, केशव लोखंडे, उमेश शेळके, अविनाश जाधव, हर्षद ओस्तवाल, निलेश नवले, विजय नरके, सागर सारंगधर कापरे, किरण झंजाड, अंबादास कुरंदळे, जगदीश पाचर्णे यांचेसह तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथमच निवडणुकीत कमळ चिन्ह नसल्याची भावना उपस्थित नेते कार्यकर्ते यांनी व्यक्त केली. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने पक्षादेश मानून सर्वांनी महायुतीचे काम करायचे असा एकमताने निर्णय घेण्यात आला. तालुक्याची कामधेनू घोडगंगा बंद पाडण्याचे पाप अशोक पवार यांनी केले आहे. तसेच सत्तेच्या माध्यमातून अनेक विरोधी कार्यकर्त्यांना नामोहरम करण्याचे काम केल्याने या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
शिरूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून राहुल (दादा) बाबूराव पाचर्णे यांची एकमताने निवड करण्यात आली. राहुल पाचर्णे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला.
राहुल पाचर्णे म्हणाले तुम्ही मला नेता केलाय, ज्या पक्षाने साहेबांना आमदार केलं त्याच पक्षात त्यांचा शेवट झाला, तोच पक्ष माझा. जो पक्ष साहेबांनी वाढवला, फुलवला त्या पक्षाला मी जपणार वाढवणार. २०१९ ला पाचर्णे साहेबांचा पराभव झाला. परंतु यावेळी मात्र महायुतीचा उमेदवार निवडून आणायचाय हा निश्चय करून कामाला सुरुवात करा असे आवाहन पाचर्णे यांनी याप्रसंगी केले.
शिवाजीराव भुजबळ म्हणाले कार्यकर्त्यांचा भावना पक्षश्रेष्ठींनी कळवणार असून भविष्यात महायुतीचेच सरकार येईल आमदारही माऊली (आबा) कटकेच होणार असा विश्वास व्यक्त केला.