लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाची धडाकेबाज कामगिरी; तीन वर्षांपासून होता फरार

वाघोली : लोणीकंद येथील दुहेरी हत्याकांडातील तीन वर्षांपासून फरार असलेला मोक्क्यातील आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाला पकडण्यात यश मिळाले आहे.
ऋग्वेद उर्फ जालिंदर वय (२३ रा. पेरणे ता. हवेली. जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. २२ ऑक्टोबर) गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने गस्त करीत असताना ऋषीकेश व्यवहारे, पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे व पोलीस अंमलदार सचिन पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दुहेरी हत्याकांडातील तीन महिन्यांपासून फरार मोक्यातील आरोपी पुणे-नगर महामार्गावरील पेरणे (ता. हवेली जि. पुणे) टोल नाक्याजवळ त्याचे राहत्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले.
सन २०२२ मधे आरोपीने त्याचे इतर साथीदारांचे मदतीने जुन्या भांडणाच्या वादातून प्रथमेश कुमार शिंदे व त्याचे वडील कुमार शिंदे यांचा खून करण्यात आला होता. खून झाल्यानंतर मागील तीन वर्षांपासून फरार झाला होता. त्याचेवर मोक्का देखील लावण्यात आला होता. मागील तीन वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर युनिट-६ च्या पथकाला पेरणे येथे त्याला सापळा रचून पकडण्यात यश आले आहे. आरोपीवर लोणीकंद, शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी खून, भांडणे व बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पुढील तपासकामी सहा. पोलीस आयुक्त येरवडा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, संभाजी सकटे, रमेश मेमाणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाने, बाळासाहेब तनपूरे, गणेश डोंगरे, सुहास तांबेकर, प्रतीक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.