शिरूरचा चेहरा-मोहरा बदलणार – आमदार अॅॅड. अशोक पवार

शिरूर : शिरूर शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला असून या विकासकामांमुळे शिरूर शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे, असे शिरूर हवेलीचे आमदार अॅॅड. अशोक पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमदार पवार म्हणाले, शहराच्या विकासात भर टाकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिरूर न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी ३३.८० तर न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी प्राप्त झाला असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या माध्यमातून नगरपरिषदेला पाच कोटी रुपये मिळाले. हा निधी कमी पडल्याने अतिरिक्त चार कोटी रुपये रुपयांचा निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हा निधीही नगर परिषदेस उपलब्ध होणार आहे. या प्रशासकीय इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत सीटी टाऊन हॉलचे नियोजन असून यासाठी सात कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. हा निधी कमी पडल्यास अतिरिक्त निधीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी ५२ कोटी
आमदार पवार म्हणाले,शिरूर शहराला स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी घोड धरणातून पाईपलाईन द्वारे पाणी आणण्याच्या योजनेसाठीचा निधी तात्काळ मिळावा यासाठी नगर परिषद सभागृह नेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,पाणीपुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी, नगरसेवक विजय दुगड, व संजय देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली.या योजनेस राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली असून ही योजना लवकरच मार्गी लागणार आहे.शहराचे वाढते नागरीकरण पाहता ही योजना शहराच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
टपरी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार
राज्य शासनाच्या मागील अर्थसंकल्पात एसटी बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जागेत ५ पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले.मात्र या जागेपैकी १४ गुंठे जागेवर एसटी महामंडळाने दावा केल्याने नियोजित जागा कमी झाली असुन शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम सुरू करण्यात येणार आहे.एसटी महामंडळाने दावा केलेली जागा देखील नगरपरिषदेस मिळावी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
घोडनदीचा काठ होणार सुशोभित
घोडनदीचा काठ सुशोभित करण्यासाठी नदीसुधार योजनेअंतर्गत निधी मिळावा म्हणून जयंत पाटील यांची भेट घेतल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत शनीमंदिर ते सुशीला पार्क या टप्प्यात वॉकिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे. यामुळे घोड नदीकाठचा हा परिसर सुशोभित होणार असून नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
विज बिल येणार शून्यावर …
शिरुर नगरपरिषद व तहसील कार्यालय येथे सोलर पॅनल सिस्टीम उभारण्यात येणार असून यामुळे या दोन्ही कार्यालयांना वीज बिलापोटी भराव्या लागणाऱ्या रकमेतून सुटका मिळणार आहे.यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. विद्याधाम प्रशालेच्या समोरील पटांगण पेव्हिंग ब्लॉक व प्लांटेशनच्या माध्यमातून सुशोभित करण्यासाठी आमदार निधी दिला जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
न्यायप्रविष्ट बाबींमुळे नगर रस्त्याचे काम थांबले
शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्याच्या कामाचे आमदार पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.याबाबत आमदार पवार म्हणाले, शिवसेवा मंडळ व्यापारी संकुलाच्या संदर्भातील बाब न्यायप्रविष्ट असल्याने तेथील काम सध्या थांबले असुन त्याबाबत माहिती घेऊन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
टेकडी परिसराचे रूप पालटणार
येथील सिद्धीच्या टेकडीवर वनविभागाच्या वतीने नगरवन या योजनेअंतर्गत या टेकडी परिसरात वॉकिंग ट्रॅक तसेच बटरफ्लाय उद्यान, एक लाख लिटरचे शेततळे, तसेच मोठ्या प्रमाणात या भागात वृक्ष लागवड करून नागरिकांना फिरण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी व त्यातून हायडेन्सिटी प्लांटेशन आधी कामामुळे लहान मुले व शिरूरकरांना याचा आनंद घेता येणार आहे.
योग्य जागा मिळताच शहरात तालुका क्रीडांगण उभारले जाणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. एकंदरीत शहरात सध्या कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू असून विविध कामे नियोजित आहेत. होत असलेली व होणाऱ्या या रचनात्मक विकास कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आमदार पवार म्हणाले.