Video: माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश
चिरंजीव सुरेंद्र पठारे, राकाँचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भय्यासाहेब जाधव यांचेसह महादेव पठारे यांनीही घेतली हाती तुतारी
पुणे : पुण्यात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना तिकडे मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे व सद्या भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत असणारे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी चिरंजीवासह तीन माजी नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुतारी कोण वाजवणार याबाबत मतदारसंघात चर्चा रंगली होती. अखेर पठारे यांनी पक्ष प्रवेश करत तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर झाले आहे. येत्या २७ सप्टेंबर रोजी खराडी येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेऊन पठारे यांची उमेदवारी जाहीर करणार आहेत. पठारे हे २००९ साली राष्ट्रवादी काँगेसचे वडगांवशेरी मतदार संघाचे आमदार होते.
पक्ष अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत वडगावशेरी मतदारसंघाचे अध्यक्ष आशिष माने, शैलेश राजगुरू यासह माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भय्यासाहेब जाधव, महादेव पठारे यांनी सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.