Video : पठारे तुतारीचा प्रचार करत असले तरी जयंत पाटील यांनी घेतली टिंगरेची भेट
वडगावशेरी मतदार संघात नेमक चाललय तरी काय?

वडगावशेरी : सद्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापुसाहेब पठारे हे तुतारी घेऊन निवडणूक लढवणार असा प्रचार करत असले तरी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप मधील आणखीन एक इच्छुक असलेले माजी नगसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री भेट दिल्याने मतदारांत संभ्रमावस्था तयार झाली आहे. वडगांवशेरी मतदार संघात नेमके चाललयं तरी काय असा प्रश्न आता नागरीक विचारू लागले आहेत.
वडगावशेरी मतदार संघात रोज वेगवेगळ्या राजकीय घडामोडी होत आहेत. महाविकास आघाडीचे जागा वाटप झालेले नाही. त्यामुळे हा मतदासंघ राष्ट्रवादी की शिवसेनेकडे जाणार हे निश्चित नसताना तुतारी हातात घेण्याकडे इच्छुकांचा कल आहे. त्यामध्ये माजी आमदार बापुसाहेब पठारे, अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे, सुरेंद्र पठारे, सुनील खांदवे-मास्तर, भिमराव गलांडे, रमेश आढाव ही मंडळी प्रयत्न करत आहेत. तर विद्यमान आमदार सुनील टिंगरे याचबरोबर शिवसेनाला (उबाठा) जागा न सुटल्यास माजी नगरसेवक संजय भोसले देखील तुतारी घेऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे. तर महायुतीमध्ये वडगावशेरीची जागा भाजपला मिळणार असल्याचा आत्मविश्वास माजी आमदार जगदीश मुळीक यांना आहे. ते देखील मंडळांना भेटी देताना आशीर्वाद मिळावा असे साकडे गणराया बरोबरच जनतेला घालत आहेत.
दरम्यान, या घडामोडी सुरू असताना माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी गणेश मंडळांना भेटी देताना तुतारीचा प्रचार सुरू केला आहे. यावर पत्रकारांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता पठारे यांना अद्याप पक्षात प्रवेश दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अन् त्याच रात्री भाजपचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या मंडळांना भेटी देत निवासस्थानी जमलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. जयंत पाटील यांच्या सोबत जेष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रकाश म्हस्के हे देखील उपस्थित होते. मागील पंधरा दिवसा पूर्वी पठारे यांच्या निवासस्थानी जयंत पाटील यांनी भेट दिली होती. त्यामुळे नेमकी तुतारी पठारे, टिंगरे की अन्य कुणाची वाजणार अशी संभ्रमावस्था सद्या मतदारांमध्ये आहे. राजकारणात एका रात्रीत काहीही होऊ शकते अशा वेगवेगळ्या राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे.
मी या आगोदर राष्ट्रवादीत असल्याने माझे प्रदेश अध्यक्ष यांच्याशी जुने सबंध आहेत. ते गणेश मंडळांना भेटीगाठी देण्यासाठी येणारं असल्याने मी त्यांना घरी येण्याची विंनती केल्याने ते घरी आले होते. मात्र मी भाजप मध्येच रहाणार असून कोणीही संभ्रमावस्था करून घेऊ नये. भाजप मधूनच निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे (माजी नगरसेवक)