गावठी दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन पिकअप पकडल्या
लोणीकंद पोलिसांची कारवाई; ७ लाख ९२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाघोली : गावठी दारू बेकायदेशीर विक्री करिता घेवून जात असलेल्या दोन पिकअप लोणीकंद पोलिसांनी पकडल्या असून दोन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस शिपाई बाळासाहेब रामदास हराळ यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा. पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, मार्शल पोलीस शिपाई रोकडे, पोशि कोकरे, लोणीकंद शहर वाहतूक विभागाचे पोना चव्हाण, पोशि चव्हाण, पोशि विनायक येवले वाघोली, केसनंद परिसरात पेट्रोलिंग करत असताना सहा. पोलीस निरीक्षक खोसे यांना दोन पांढऱ्या रंगाच्या पीकअप (क्र. एमएच ४२ एम ८५०६ व एमएच ४२ एम ८८०६) मधून गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीर विक्री करीता वाघोली येथील केसनंद फाट्यावरून पुण्याकडे जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
लोणीकंद पोलिसांनी केसनंद फाटा येथे मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन पिकअप गाड्या थांबवून चालकांची विचारपूस करून तपासणी केली असता दोन्ही पिकअप मध्ये गावठी हातभट्टीची दारू असलेल्या प्लास्टिक कॅन आढळून आल्या. पोलिसांनी चालकांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता उरळीकांचन येथून आणली असून येरवडा (पुणे) येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. नितेश भालसिंग राठोड (वय २१ रा. उरुळीकांचन ता. दौड) व इंद्रजीत मारुती राठोड (वय २२ रा. उरुळीकांचन ता. दौंड) या दोघांवर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गावठी दारू असलेल्या प्लॅस्टीक कॅनसह ७ लाख ९२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
सदरील कारवाई लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, मार्शल पोलीस शिपाई रोकडे, पोशि कोकरे, लोणीकंद शहर वाहतूक विभागाचे पोना चव्हाण, पोशि चव्हाण, पोशि विनायक येवले यांनी केली आहे.