अज्ञात महिलेच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल
धड, हातपाय, डोके कापून नदीपात्रात फेकले; खराडी येथील धक्कादायक घटना
वडगावशेरी : खराडी येथील मुळा- मुठा नदी पात्रात सोमवारी (२६ ऑगस्ट) दुपारी एका स्त्री जातीचे फक्त धड मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नदीमधील या मृतदेहाचे शिर व हात पाय कापण्यात आलेले असून केवळ धड मिळून आलेले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अज्ञात स्त्रीच्या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जवळ असलेल्या बांधकाम साईट वरील मजुरांनी मृतदेह असल्याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रातील हे स्त्री जातीचे धड शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे. अंदाजे ५० ते ६० वयोगटातील स्त्री जातीचे असून तिच्या शरीराचे इतर भाग कापण्यात आलेले आहेत. या गंभीर घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह साधारण दोन ते तीन दिवसापूर्वीची असू शकते असे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने सांगितले. महिलेच्या अंगावर केवळ डाग आढळून येतो. चेहरा नसल्याने ओळख पटवण्यात अडथळे येत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.