Video : माजी नगरसेवक अविनाश साळवे यांचा काँगेस पक्षात प्रवेश
कॅन्टोन्मेंट मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक

येरवडा : येरवडा येथील शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी नगरसेवक अविनाश राज साळवे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँगेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार, खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री नितीन राऊत, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. साळवे हे पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
२०१७ च्या पुणे महानगर पालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँगेस मधून शिवसेनेत प्रवेश केला होता. चार सदस्य प्रभाग पद्धतीमध्ये त्यावेळी येरवड्यातून तिघेजण शिवसेनेचे निवडून आले होते. साळवे यांनी चार वेळा नगरसेवक पद तसेच विरोधी पक्ष नेते पद देखील भूषविले आहे. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र त्यांनी राजकीय संधी पाहून अनेकवेळा पक्ष बदलले आहेत. काँग्रेस, आरपीआय, गवई गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना त्यानंतर आता पुन्हा काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास साळवे इच्छुक आहेत. मात्र माजी गृहमंत्री रमेश बागवे देखील काँगेस कडून इच्छुक असल्याने या दोघांमध्ये उमेदवारीवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.