वाघोली येथील दरोड्यातील पाच आरोपी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पुणे : वाघोली येथील चोखीदाणी रोडवरील दुर्गामाता मंदिर परिसरात तिघांना बेदम मारहाण करून जबरदस्ती स्विफ्ट गाडीत अपहरण करून पोदार शाळा येथील नवीन बांधकाम साईटवर नेवून लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून पकडण्यात यश मिळवले आहे.
कुमार मोहन पवार (वय २२ रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली), नितीन मोहन पवार (वय १९ रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली), ओम लक्ष्मण गव्हाणे (वय १९ रा. साई सत्यम पार्क, उबाळेनगर, वाघोली), मनोज सुखदेव निंबाळकर (वय २१ रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली), विकास दिगंबर कांबळे (वय २१ उबाळेनगर, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार समीर पिलाने, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे यांना वाघोली येथील रविवारी (दि. २८ जुलै) घडलेल्या दरोड्यातील घटनेतील आरोपी आव्हाळवाडी गावाच्या हद्दीत आव्हाळवाडी ते खराडी रस्त्यावरील बायफ कंपनीजवळ लाल रंगाचे स्वीफ्ट गाडीसह उभे असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली. माहिती मिळताच युनिट-६ च्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेवून जेरबंद केले. त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून आरोपींना लोणीकंद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश ताकवणे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.